Sangli: कवठेमहांकाळमध्ये सराफ दुकान फोडले, रोख रकमेसह पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास
By अशोक डोंबाळे | Published: December 22, 2023 06:50 PM2023-12-22T18:50:15+5:302023-12-22T18:52:36+5:30
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथील मल्लिकार्जुन मंदिराजवळ असलेले सराफ दुकान शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी लुटले. दुकानातील राेख रकमेसह साेन्या-चांदीचे दागिने ...
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथील मल्लिकार्जुन मंदिराजवळ असलेले सराफ दुकान शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी लुटले. दुकानातील राेख रकमेसह साेन्या-चांदीचे दागिने असा २ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी सराफ व्यावसायिक योगेश भुपाल जंगम (वय ३८, रा. जत रोड आयटीआय कॉलेजच्या पाठीमागे कवठेमहांकाळ) यांनी कवठेमहांकाळ पोलिसात फिर्याद दिली आहे.
कवठेमहांकाळ येथे मल्लिकार्जुन मंदिराजवळ याेगेश जंगम यांचे यश ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. दुकानात त्यांनी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवली आहे. गुरुवार दि. २१ रोजी रात्री ८ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून जंगम घरी गेले. शुक्रवार दि. २२ रोजी पहाटे २ वाजून २७ मिनिटांनी जंगम यांच्या मोबाईलवर दुकानातील कुलपाशी छेडछाड हाेत असल्याचा गजर वाजू लागला. लगेचच ते माेटारीतून दुकानाकडे आले. यावेळी दुकानाचे लाेखंडी शटर अर्धवट उघडे व आतील कुलूप तुटलेले दिसले. दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तत्काळ त्यांनी कवठेमहांकाळ पाेलिसांशी संपर्क साधला. कवठेमहांकाळ पोलिसही काही क्षणातच घटनास्थळी पाेहाेचले. दुकानात जाऊन पाहिले असता विक्रीस ठेवलेले चांदीचे दागिने, बेन्टेक्सचे दागिने, सोन्याची मोड व सात हजार रुपये रोख तसेच सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीन गायब हाेते. दीड लाख किमतीचे तीन किलो चांदीचे तयार दागिने, एक लाख किमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची मोड, दहा हजारांचे बेन्टेक्सचे दागिने, सात हजारांची रोकड व पाच हजार रुपये किमतीचे सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीन असा २ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधीक्षक सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी पाहणी केली. श्वानपथकाच्या मदतीने चाेरट्यांचा माग काढण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रविराज जमादार करीत आहेत.