भिलवडीत कापड दुकान फोडून रोख रकमेसह पाच लाखांचा माल लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 07:03 PM2022-04-11T19:03:28+5:302022-04-11T19:03:54+5:30
भिलवडी : भिलवडी, ता. पलुस येथे मेन रस्त्यावरील राज वस्त्रम हे कापड दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी महागड्या साड्या, कपडे ...
भिलवडी : भिलवडी, ता. पलुस येथे मेन रस्त्यावरील राज वस्त्रम हे कापड दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी महागड्या साड्या, कपडे व ६० हजार रुपये रोख रकमेसह अंदाजे पाच लाख १२ हजार रुपयांचा माल लंपास केला. ही घटना रविवारी रात्री घडली. यावेळी वादळी वाऱ्यासह सुरू असलेला पाऊस व खंडित वीजपुरवठा याच फायदा घेत चोरट्यांनी धाडसी चोरी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोंडेही उलट दिशेला फिरवल्याचे दिसून आले.
भिलवडी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व राज वस्त्रमचे मालक महेश सदाशिव शेटे यांनी भिलवडी पोलिसांत चोरीच्या घटनेबाबत फिर्याद दिली आहे. भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सांगलीहून आणलेले श्वानपथक दुकानाच्या परिसरातच घुटमळत होते. चार लाख रुपयांच्या नामवंत कंपनीच्या महागड्या साड्या, पस्तीस हजार रुपयांचे कापड, ६० हजार रुपये रोख रक्कम व १८ हजार ५०० रुपये किमतीची डीव्हीआर व हार्ड डिस्क असा एकूण पाच लाख १३ हजार रुपयांचा माल लांबाविला आहे.
पोलीस व प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महेश शेटे यांचा मुलगा मनीष शेटे सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान दुकान उघडण्यासाठी गेला असता शटरच्या दरवाजाच्या लोखंडी पट्ट्या ग्राइंडरने कापून कुलूप काढले असल्याचे निदर्शनास आले. त्याने दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यावर चोरीचा प्रकार घडला असल्याचे लक्षात आले. त्यांनी संगणक सुरू करून सीसीटीव्ही फूटेजची तपासणी सुरू केली असता चोरट्यांनी डीव्हीआर व हार्ड डिस्क काढून नेले असून दुकानाच्या बाहेर व आत असणाऱ्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोंडेही उलट दिशेला फिरवली होती.
सदर घटनेतील चोरटे हे सराईत असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. भिलवडी परिसरात लहान-मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वारंवार घडत असून पोलिसांनी त्यांचा तत्काळ छडा लावा, अशी मागणी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.