सांगली पोलिस मुख्यालयात घुसून चोरी, तीन महिला अटकेत

By घनशाम नवाथे | Published: June 5, 2024 07:34 PM2024-06-05T19:34:26+5:302024-06-05T19:34:48+5:30

सांगली : विश्रामबाग येथे शेकडो पोलिसांचा राबता असलेल्या पोलिस मुख्यालयाच्या मागील बाजूस परिवहन विभागात घुसून वाहनांचे सुटे भाग चोरणाऱ्या ...

Theft by breaking into the Sangli police headquarters, Three women arrested | सांगली पोलिस मुख्यालयात घुसून चोरी, तीन महिला अटकेत

सांगली पोलिस मुख्यालयात घुसून चोरी, तीन महिला अटकेत

सांगली : विश्रामबाग येथे शेकडो पोलिसांचा राबता असलेल्या पोलिस मुख्यालयाच्या मागील बाजूस परिवहन विभागात घुसून वाहनांचे सुटे भाग चोरणाऱ्या गीता अनिल कुंचिकोरवी (वय ३०, रा. सुभाषनगर, मिरज), सुनीता भारत पवार (वय २७, रा. वडर कॉलनी, वांगीकर प्लॉट, सांगली) आणि राधा मार्तंड माळी (वय २५, रा. वांगीकर प्लॉट, वडर कॉलनी, सांगली) या तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघींकडून १२ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत माहिती अशी, पोलिस मुख्यालयाच्या इमारतीच्या मागील बाजूस पोलिसांचा मोटार वाहन विभाग आहे. या विभागाच्या मागील बाजूस रेल्वे लाईन आहे. मोटार वाहन परिवहन विभागाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आवारात जुनी वाहने लावण्यात आली होती. दि. ४ रोजी पहाटे ५.३० च्या सुमारास संशयित तीन महिला मोटार वाहन विभागाजवळ आल्या. त्यानंतर आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून वाहनांचे सुटे भाग काढून घेतले.

सुटे भाग काढून घेतल्यानंतर त्या पळून जात होत्या. तेवढ्यात पोलिसांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी ओरडल्यानंतर महिला पळून जाऊ लागल्या. तेव्हा पाठलाग करून तिघींना ताब्यात घेतले. तीन महिलांकडे वाहनांच्या सीट, टायर मॅगवेल, पेट्रोलची टाकी, ॲल्युमिनिअमची तार असा १२ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला.

पोलिस हवालदार रियाज अहमद मुसा मुजावर यांनी याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात त्यांना दिले आहे.

पोलिसांच्या इलाख्यात चोरीचे धाडस

काही वर्षांपूर्वी पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याजवळील चंदनाची झाडे चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. तसेच दुसऱ्यांदा चंदन चोरी करताना चोरट्यास पकडले होते. त्यानंतर पोलिस मुख्यालयात घुसून महिलांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांचा राबता असलेल्या ठिकाणी चोरीचे धाडस करत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Theft by breaking into the Sangli police headquarters, Three women arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.