सांगली सायबर पोलिसांकडून चोरी, हरविलेल्या १३८ मोबाईलचा शोध, १४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
By शीतल पाटील | Published: August 21, 2023 04:24 PM2023-08-21T16:24:21+5:302023-08-21T16:24:40+5:30
सांगली : सांगलीच्या सायबर शाखेचा तपासाचा आलेख दिवसेदिवस वाढत चालला आहे. गेल्या महिन्याभरात सायबर शाखेला चोरी व हरविलेल्या १३८ ...
सांगली : सांगलीच्या सायबर शाखेचा तपासाचा आलेख दिवसेदिवस वाढत चालला आहे. गेल्या महिन्याभरात सायबर शाखेला चोरी व हरविलेल्या १३८ मोबाईलचा शोध घेण्यात यश आले. याची किंमत जवळपास १४ लाख रुपये इतकी आहे. हे मोबाईल नागरिकांना परत करण्यात येत असल्याचे सायबर शाखेचे निरीक्षक संजय हिरूगडे यांनी सांगितले.
सायबर शाखेने ऑनलाईन फसवणुकीतील अनेक गुन्ह्याचा तपास पूर्ण केला आहे. आता या शाखेकडून चोरी व गहाळ झालेले मोबाईल शोधण्याची मोहिम हाती घेतली आहे. पोलिस अधिक्षक डाॅ. बसवराज तेली, अप्पर अधिक्षक तुषार पाटील यांच्या आदेशाने ही मोहिम हाती घेण्यात आली. त्यासाठी सायबर पोलिस ठाण्यातर्गंत मोबाईल थेप्ट युनीट स्थापन करण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांचे गहाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिक माहितीद्वारे तपास करण्यात आला. यात महिन्याभरात पाच लाख किंमतीचे ५० मोबाईल मिळून आले. तसेच सायबर पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यांना तांत्रिक माहिती पुरवून ८८ मोबाईल हस्तगत करण्यास मदत केली.
यात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याकडील १२, महात्मा गांधी चौकीकडील २७, इस्लामपूर पोलिस ठाणे २७ आणि विटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २२ मोबाईलचा समावेश आहे. महिन्याभरात १३८ मोबाईलचा शोध घेतला आहे. गत जानेवारी महिन्यात १५० मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले होते. आताही हस्तगत केलेले मोबाईल संबंधित नागरिकांना परत करण्यात येत आहेत.
या कारवाईत निरीक्षक हारुगडे यांच्यासह उपनिरीक्षक रोहिदास पवार, करण परदेशी, विवेक साळुंखे, अजय पाटील, स्वप्नील नायकोडे, कॅप्टन गुंडेवाडे, इम्रान महालकरी, रुपाली पवार, रेखा कोळी, सलमा इनामदार यांनी भाग घेतला.