वाळवा येथील महालक्ष्मी मंदिरात चोरी;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:10 AM2020-12-05T05:10:07+5:302020-12-05T05:10:07+5:30
वाळवा : येथील लक्ष्मीनगरमधील पुरातन महालक्ष्मी मंदिरात चोरट्यांनी बुधवारी रात्री चोरी केली. यात सात किलो चांदीचे मखर आणि चांदीची ...
वाळवा : येथील लक्ष्मीनगरमधील पुरातन महालक्ष्मी मंदिरात चोरट्यांनी बुधवारी रात्री चोरी केली. यात सात किलो चांदीचे मखर आणि चांदीची भांडी असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत राहुल गुरव यांनी आष्टा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
वाळवा गावापासून सव्वादोन कि.मी. अंतरावर कृष्णा नदीकाठावर हे पुरातन मंदिर आहे. मंदिराच्या पश्चिमेस हाकेच्या अंतरावर गुरव समाजाची काही घरे आहेत. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय असून सध्या हा कॅमेरा बंद आहे. बुधवारी रात्री चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला व मंदिरातील सात किलो चांदीचे मखर नटबोल्ट काढून लंपास केले. तसेच देवीसमोरील चांदीचा तांब्या, भांडे व तबकडी सुध्दा चोरली.
गुरुवारी पहाटे पुजारी राहुल गुरव पूजेसाठी मंदिरात गेल्यावर चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने लोकांना बोलावून आष्टा पोलिसांत चोरीची नोंद केली. पोलिसांनी पंचनामा केला असून तपास उपनिरीक्षक अशोक ढेरे करीत आहेत.