शिराळा येथे सात लाखाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:32 AM2021-07-14T04:32:38+5:302021-07-14T04:32:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : येथील गुरुवार पेठ रस्त्यावरील मारुती रामचंद्र हावळ यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चाेरट्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : येथील गुरुवार पेठ रस्त्यावरील मारुती रामचंद्र हावळ यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चाेरट्यांनी कपाटातील १५ तोळे सोने, चांदी व मोत्याचे दागिने व १८ हजार रुपये रोख रक्कम असा ७ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी रात्री १० ते सोमवारी सकाळी ६ च्या दरम्यान घडली. याचबरोबर चाेरट्यांनी जवळच्या अन्य दोन घरांचे कुलूप व कोयंडे तोडले. मात्र तेथे त्यांच्या हाती काहीही लागले नाही.
मारुती हावळ यांचे शहराच्या मध्यवर्ती गुरुवार पेठेत दुमजली घर आहे. पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह सर्व कुटुंबीय घराच्या पहिल्या मजल्यावर झाेपले हाेते. चाेरट्यांनी घराच्या तळमजल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे गंठण, मंगळसूत्र, बांगड्या, लॉकेट, अंगठ्या, कर्णफुले, लहान मुलांचे दागिने असे १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने तसेच मोत्यांच्या दागिन्यांचा सेट, जुनी चांदीची ९० नाणी असा जवळपास ७ लाख रुपयांचा ऐवज व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.
साेमवारी सकाळी ६ च्या दरम्यान मारुती हावळ खालच्या मजल्यावर आले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. दार उघडून घरात ते आले असता, सर्व साहित्य विस्कटलेले दिसले. तातडीने त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख सर्जेराव गायकवाड, विभागीय पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहायक निरीक्षक अविनाश वाडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
रात्री १ वाजेपर्यंत मारुती हावळ यांचा मुलगा शुभम अभ्यास करत होता, तर मारुती हावळ सकाळी ६ वाजता खाली आले. यामुळे रात्री १ ते सकाळी ६ या वेळेत चाेरीचा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी कपाटातील दागिन्यांबरोबरच असणाऱ्या बँक ठेवपावत्या, आधारकार्ड आदी कागदपत्रे, पर्स, मोकळ्या दागिन्यांच्या डब्या आदी साहित्य जवळच असणाऱ्या नाल्यात फेकून दिलेले आढळून आले.
याबाबत मारुती हावळ यांनी शिराळा पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तपासासाठी बाेलावण्यात आलेले श्वानपथक पावसामुळे परिसरातच घुटमळले. घटनास्थळी ठसेतज्ज्ञांनाही बोलाविण्यात आले. शहरातील काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, गोपाळ कृष्ण पथ येथील सतीश मिरजकर व श्री राम मंदिर रस्त्यावरील मारुती काकडे यांच्याही घराचे कडी-कोयंडे चाेरट्यांनी कटावणीने तोडले. मात्र घरातून कोणतीही वस्तू चोरीस गेली नाही.