चिंतामणीनगरमधील आठ लाखाच्या चोरीचा अखेर छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:33 AM2021-09-08T04:33:16+5:302021-09-08T04:33:16+5:30
सांगली : चिंतामणीनगर येथे भावाच्या घरात डल्ला मारून पसार झालेल्या चोरट्याला संजयनगर पोलिसांच्या पथकाने अवघ्या चार दिवसात अटक ...
सांगली : चिंतामणीनगर येथे भावाच्या घरात डल्ला मारून पसार झालेल्या चोरट्याला संजयनगर पोलिसांच्या पथकाने अवघ्या चार दिवसात अटक केली. त्याच्याकडून आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दिनेशचंदकुमार मुन्नालाल कुम्हार (वय ३२, रा. नावा, जि. नागौर, राजस्थान) असे संशयिताचे नाव असून, चोरीनंतर तो राजस्थानात पसार झाला होता.
नात्याने आत्येभाऊ असलेला दिनेशचंदकुमार कुम्हार याला ललीतकुमार मोहनलाल कुमावत (रा. राजनगर) यांनी सहकारी म्हणून दुकानात ठेवले होते. रक्षाबंधनासाठी कुमावत कुटुंबासह राजस्थानला गेले होते. त्यावेळी बंद बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेडरुमधील कपाट फोडले. त्यातील ५ लाख ४४ हजार ६०० रुपयांसह ११ तोळे दागिने, अर्धा किलो चांदीचे दागिने असा एकूण ८ लाख ४२ हजार रुपये किमतीचा माल चोरला. घटनेनंतर दिनेशचंदकुमार कुम्हार पसार झाल्याने त्याच्यावर संशय बळावला होता. याप्रकरणी संजयनगर पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. राजस्थानच्या सीमेपर्यंत पथकाने धडक मारत त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संजयनगर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखालील कारवाईत उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहाय्यक फौजदार रवी आवळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दिनेश माने, मुद्दसर पाथरवट, संतोष पुजारी, हणमंत कांबळे, आकाश गायकवाड, नीलेश डोंगरे यांचा सहभाग होता.