बसर्गीत वृद्धेच्या सहा तोळे सोन्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:25 AM2021-03-25T04:25:58+5:302021-03-25T04:25:58+5:30
जत : बसर्गी (ता. जत) येथे सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने वृद्धेचे सहा तोळे सोने चोरट्यांनी लंपास ...
जत : बसर्गी (ता. जत) येथे सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने वृद्धेचे सहा तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. सुवर्णा बापूराय बिराजदार (वय ६५) यांनी आपले सुमारे दोन लाख ९० हजार रुपये किमतीचे दागिने चोरी झाल्याची फिर्याद बुधवारी जत पोलीस ठाण्यात दिली आहे.
सुवर्णा बिराजदार या बसर्गी गावालगत असलेल्या मळ्यात राहतात. त्यांची मुलगी सरोजनी बिराजदार या माहेरी बसर्गी येथे आल्या होत्या. मंगळवारी दुपारी सर्व जण शेतात कामाला गेल्यानंतर सुवर्णा व सरोजनी या दोघीच घरी होत्या. ४० ते ४५ वयोगटातील दोन चोरटे दुचाकीवरून त्यांच्या घरी आले. दागिने पॉलिश मारून नवीन चकचकित करून देतो, असा बहाणा करून त्यांनी त्यांच्या अंगावरील चार तोळ्याचे सोन्याचे एक गंठण, एक तोळ्याचे एक मंगळसूत्र व दोन तोळ्याचे दुसरे मंगळसूत्र व पाच ग्रॅम वजनाची कानातील कर्णफुले असे दागिने काढून घेऊन चोरट्यांनी त्यांना घरातील कुकरमध्ये ठेवण्यास सांगितले. मात्र, हातचलाकी करत त्यांनी दागिने स्वत:कडे ठेवून मोकळा कुकर दिला. तो कुकर गॅस शेगडीवर ठेवा व दहा मिनिटांनंतर कुकर बंद करून तुम्ही दागिने काढून बघा, असे चोरट्यांनी सांगितले.
दहा मिनिटांनंतर सुवर्णा व सरोजनी यांनी कुकर बंद करून आत पाहिले असता, त्यांना दागिने दिसले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही घटना त्यांनी घरातील सदस्यांना सांगितली. परंतु, तोपर्यंत चोरट्यांनी पलायन केले होते. याबाबत बुधवारी सुवर्णा बिराजदार यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके करत आहेत.