चोरी सापडली आणि मोठा अनर्थ टळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:09 AM2017-09-18T01:09:44+5:302017-09-18T01:09:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वांगी : हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे व सोलापूर या इंधन वहन करणाºया मोठ्या पाईपलाईनला छिद्र पाडून इंधन चोरी करण्याचा प्रयत्न येवलेवाडी (ता. कडेगाव) येथे करण्यात आला. चोरट्यांनी शेतात लोखंडी पाईपलाईन बसवून एका मोठ्या संकटाला निमंत्रण दिले होते. वेळीच हा प्रकार कंपनीच्या लक्षात आल्याने एक मोठा अनर्थ टळला.
हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने पेट्रोल, डिझेल व गॅस वाहतूक करण्यासाठी पाच वर्षापूर्वी मुंबई-पुणे ते हजारवाडी (ता. पलूस) व हजारवाडी ते सोलापूर अशी अत्याधुनिक पाईपलाईन केली आहे. ही लाईन कडेगाव तालुक्यातून गेली आहे. शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्यादरम्यान येवलेवाडी येथील अंकुश यशवंत जगताप यांच्या गट नं. २०५ मधील जमिनीत अज्ञातांनी जेसीबीसारख्या यंत्राने जमीन खोदून इंधन वाहक पाईपला छिद्र पाडले. वेल्डिंग मशीनच्या साहाय्याने दुसरी पाईप जोडून शेताच्या दुसºया बाजूस व्हॉल्व्ह बसवून सर्व पाईप मुजवून टाकली. नवीन केलेली पाईपलाईन दिसू नये म्हणून शेतात रोटर मारला. हा व्हॉल्व्ह चालू केल्यानंतर कंपनीच्या हजारवाडी येथील कार्यालयात पाईपवरील इंधनाचा दाब कमी झाल्याचे लक्षात आले. इंधन चोरी होत असल्याची शंका अधिकाºयांच्या मनात आली. यानंतर तातडीने सर्व कर्मचारी व अधिकारी शोध घेत येवलेवाडी परिसरात घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत चोरट्यांनी तेथून पलायन के ले होते. याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक निमेश सिंग यांनी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोज सोलवणकर करीत आहेत.
इंधन चोरी झाली नसल्याचे कंपनीचे म्हणणे असले तरी, घटनास्थळापासून जवळच्या माळरानावर डिझेल सांडल्याचे दिसून येत असल्याने याची जोरदार चर्चा सुरू होती.
चोरट्यांचा हा प्रयोग स्फोटक व मोठ्या संकटाला निमंत्रण देणार होता. त्यामुळे ही बाब समोर आल्यानंतर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
...अन्यथा गावे पेटली असती
चोरट्यांनी इंधन चोरीसाठी मुख्य पाईपला दुसरी पाईप वेल्डिंगच्या साहाय्याने जोडली, मात्र वेळ चांगली म्हणून इंधनाने पेट घेतला नाही. जर इंधनाने पेट घेतला असता, तर गावेच्या गावे पेटली असती. मोठ्या दुर्घटनेलाच या चोरीच्या प्रकाराने निमंत्रण दिले होते.