...तर दालमियांची उचलबांगडी
By admin | Published: October 30, 2015 11:55 PM2015-10-30T23:55:17+5:302015-10-31T00:30:33+5:30
भरत पाटणकर : उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरूच
सागाव : निनाईदेवी कामगारांच्या प्रश्नांबाबत तोडगा काढण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीस दालमिया शुगरचे प्रशासन हजर न राहिल्यास त्यांची उचलबांगडी करू, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.
निनाईदेवी साखर कामगारांच्या बेमुदत उपोषणास पाठिंबा देण्यासाठी कारखाना सभासद व कामगारांच्या महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख, डॉ. भारत पाटणकर, हणमंतराव पाटील, पी. वाय. पाटील उपस्थित होते. आंदोलनाची पुढील दिशा आक्रमक करण्याचा इशारा यावेळी दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रमुख नेत्यांशी संपर्क साधून, सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर, कामगारांशी चर्चा केल्यानंतर उपोषण मागे घेऊन तोडगा निघेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी सत्यजित देशमुख म्हणाले, कामगारांच्या प्रश्नांबाबतचा निर्णय होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवू. डॉ. पाटणकर म्हणाले, सहकार क्षेत्र संपविण्याची मानसिकता या सरकारची असल्याने या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या कामगारांच्या प्रश्नांबाबतचा लढा आता फक्त कामगारांचा राहिलेला नाही, तर तो कामगार व सभासदांचा संयुक्त लढा सुरू झाला आहे. हा प्रश्न फक्त कामगारांचा नसून शेतकरी, कष्टकरी जनतेच्या अस्तित्वाचा हा प्रश्न झाला आहे. आठ दिवस शासकीय व दालमिया प्रशासनाने या आंदोलनाकडे गंमत म्हणून पाहिले. परंतु पुढील लढ्याचा इशारा देताच हे प्रशासनदेखील हादरले.
यावेळी विकासराव देशमुख, हणमंतराव पाटील, बाळासाहेब पाटील, के. डी. पाटील, सभापती चंद्रकांत पाटील, पी. वाय. पाटील, माजी सभापती शारदा धारगे, शारदा पाटील, जि. प. सदस्य सुशिला नांगरे, तानाजी कुंभार, सुनील पाटील, हिंदुराव नांगरे, विकास नांगरे, पोपट पाटील, उत्तम गावडे, सर्जेराव पाटील, माजी उपसभापती आनंदराव पाटील, बाजीराव पाटील, शंकर कदम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)