‘कृष्णा’च्या तत्कालीन कार्यकारी संचालकाला अटक
By admin | Published: April 20, 2017 11:06 PM2017-04-20T23:06:32+5:302017-04-20T23:06:32+5:30
‘कृष्णा’च्या तत्कालीन कार्यकारी संचालकाला अटक
कऱ्हाड : कृष्णा कारखान्यातील बोगस कर्जप्रकरणी तत्कालीन कार्यकारी संचालकांना बुधवारी रात्री उशिरा कऱ्हाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. अशोक श्रीरंग नलवडे (रा. मंगळवेढा) असे त्यांचे नाव आहे. अशोक नलवडे हे सध्या मंगळवेढ्यातील दामाजी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत आहेत.
रेठरे बुद्रुक-शिवनगर येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात बोगस कर्ज प्रकरणे झाल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला आहे. कारखान्याच्या ७८४ ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या नावे बोगस स्वाक्षऱ्या करून प्रत्येकी सात लाख रुपयांप्रमाणे ५८ कोटींचे कर्ज काढण्यात आले होते. या कर्जाबाबत ऊसतोडणी वाहतूकदार अनभिज्ञ असतानाच अचानक त्यांना कर्जाची परतफेड करण्यासंदर्भात बँकेकडून नोटीस पाठविण्यात आली. त्यानंतर या प्रकाराचा भांडाफोड झाला. ४ आॅगस्ट २०१६ रोजी तांबवे (ता. वाळवा) येथील यशवंत पाटील या वाहतूकदाराने याबाबत कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार तपास सुरू असताना सुरुवातीलाच कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना पोलिसांनी अटक केली. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी आठ माजी संचालकांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक अशोक नलवडे हे सध्या मंगळवेढ्यातील दामाजी साखर कारखान्यात कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक कांबळे यांच्यासह एक पथक बुधवारी मंगळवेढ्याला गेले. सायंकाळी नलवडे यांना तेथून पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा कऱ्हाडात त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
कोठडीत रवानगी
अटकेची कारवाई केल्यानंतर अशोक नलवडे यांना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी नेले. त्यावेळी त्यांची प्रकृती सुस्थितीत नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दुपारी नलवडे यांना न्यायालयात हजर केले असता पोलिस प्रक्रिया राखून ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.