Sangli: ..तर म्हैसाळच्या वनमोरे कुटुंबातील तिघांचे जीव वाचले असते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 07:03 PM2024-10-02T19:03:38+5:302024-10-02T19:03:57+5:30

सुशांत घोरपडे म्हैसाळ : एका शेतकऱ्याने विद्युत यंत्रणेतील बिघाडाबाबत महावितरणकडे तक्रार केली होती. मात्र, संबंधित शेतकऱ्याची थकबाकी असल्याने त्याची ...

..then lives would have been saved, Three victims of Vanamore family in Mhaisal due to electric shock | Sangli: ..तर म्हैसाळच्या वनमोरे कुटुंबातील तिघांचे जीव वाचले असते

Sangli: ..तर म्हैसाळच्या वनमोरे कुटुंबातील तिघांचे जीव वाचले असते

सुशांत घोरपडे

म्हैसाळ : एका शेतकऱ्याने विद्युत यंत्रणेतील बिघाडाबाबत महावितरणकडे तक्रार केली होती. मात्र, संबंधित शेतकऱ्याची थकबाकी असल्याने त्याची तक्रार बेदखल करण्यात आली आणि काही वेळातच विद्युत तारेच्या शॉकने वनमोरे कुटुंबातील तिघांचा बळी गेला. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बेफिकिरीने एक कुटुंब उद्ध्वस्त केले.

म्हैसाळ येथील सुतारकीमाळ परिसरात वनमोरे कुटुंबीय वास्तव्यास आहे. पारसनाथ वनमोरे व त्यांचा पंथरा वर्षांचा मुलगा हेमंत वनमोरे, दूसरा बारा वर्षांचा मुलगा साईराज वनमोरे हे तिघे वैरण काढण्यासाठी शेतात गेले होते. विद्युत तार तुटून पडल्याने तसेच शेतात पावसाने दलदल निर्माण झाल्याने शॉक बसून पारसनाथ वनमोरे व प्रदीप वनमोरे या दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे असणाऱ्या साईराजने हा प्रकार पाहिला आणि घराकडे पळत जाऊन त्याने कुटुंबीयांना माहिती दिली, वडिलांना पाणी घेऊन तो घटनास्थळी आला आणि त्याचाही शॉक लागून जागीच मृत्यू झाला.

पारसनाथ यांचे चुलत बंधू प्रदीप वनमोरे हे बांधाच्या पश्चिम बाजूने घटनास्थळी जात असताना साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांचा व त्यांच्यासोबत आलेल्या कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. पारसनाथ यांचा मोठा मुलगा हेमंत वनमोरे यालाही शॉक लागला, मात्र तो बाजूला फेकला गेल्याने बचावला, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेमंत जखमी अवस्थेतही पप्पा, पप्पा अशी आठवण काढत आहे.

शेतकऱ्याचे प्रसंगावधान

घटना घडल्यानंतर वनमोरे कुटुंबीयांच्या शेजारी राहणाऱ्या संतोष पाटील यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना माहिती देत विद्युत पुरवठा बंद करायला लावला, पायल पाटीलने तत्काळ रुग्णवाहिकेला फोन केला. त्यामुळे जखमी हेमंतला वेळेवर उपचारासाठी नेण्यात आले.

महावितरणची जीवघेणी शक्कल 

जनित्रात असलेल्या फ्यूजमध्ये सिंगल तार असते. विद्युत यत्रणेत काही बिघाड झाला, तर फ्यूज उडून विद्युतपुरवठा बंद होत असतो. मात्र महावितरण कर्मचाऱ्याऱ्यांनी वारंवार दुरुस्तीचा त्रास टाळण्यासाठी फ्यूजमध्ये सिंगल तारेऐवजी अनेक तारा गुंडाळल्या आहेत. त्यामुळे यंत्रणेत बिघाड होऊनहीं विद्युतप्रवाह चालूच राहिला, अशी तक्रार काही शेतकऱ्याऱ्यांनी 'लोकमत कडे मांडली.

शेतकऱ्यांनी 'लोकमत'कडे मांडल्या तक्रारी

  • विद्युत तारा जीर्ण झाल्या आहेत. 
  • विद्युत प्रवाहित तारांची उंची कमी आहे.
  • तुटलेल्या वायरींचे अनेकदा जोडकाम केले आहे.
  • विद्युत जनित्राला समान भार नाही. 
  • जनित्राच्या एका बाजूला तीन तर दुसऱ्या बाजूला अंदाजे पंधरा मोटारी आहेत.
  • महावितरणकडून प्रत्येक तक्रार बेदखल केली जाते 
  • विद्युत यंत्रणेतील बिघाड शोधण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर टाकली जाते.


शेतात जाण्याऐवजी दुसरीकडे गेले दोन जीव वाचले

वनमोरे कुटुंबीयाच्या शेजारी केतन पार्टील राहायला आहेत. केतन पाटील हे मोटार चालू करण्यासाठी जाणार होते. मात्र, त्यांच्या वडिलांनी मोटार चालू करायला जाण्यास नकार देत त्यांना विजयनगर येथील शेताकडे नेले. त्यामुळे केतनचा जीव वाचला. ऑनलाइन तक्रार केलेल्या हा सुद्धा विद्युत यंत्रणेतील बिघाड शोधण्यासाठी जाणार होता. मात्र शेतात दलदल झाल्याने तो परत फिरला. त्यामुळे या दोघांचे जीव वाचले.

चिमुकल्याचा गेला बळी

रविवारी सुटीचा दिवस असल्याने वडील पारसनाथ बरोबर साईराज व हेमंत हे दोघे वैरण आणण्यासाठी गेले होते. पारसनाथ व हेमंत या दोघांना शॉक लागल्याचे सांगत साईराज घराकडे धावत आला. 'मम्मी! पप्पा व हेम्या पडले आहेत, त्यांच्यासाठी पाणी दे, अशी हाक त्याने दिली. पाणी घेऊन तो घटनास्थळी गेला मात्र त्याचाही मृत्यू झाला.

शेतातील विद्युत यंत्रणा सिंगल फ्यूज आहे. जनित्रावरील एका भागातील मोटार चालू आहे तर दुसया भागातील मोटार बंद आहेत. याबाबत शंका आल्याने मी महावितरणच्या कस्टमर केअरकडे ऑनलाइन तक्रार केली. त्यावेळी माझ्या थकबाकीचे कारण देत संबंधित कर्मचाऱ्याने तक्रार घेऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. - विशाल चौंडाज, शेतकरी
 

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, महावितरणने कुटुंबीयांना आर्थिक भरपाईसुद्धा द्यायला हवी. - सुनील कांबळे, मृतांचे नातेवाईक

घटनास्थळावरील विद्युत जनित्रासह विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांचे परीक्षण आम्ही करणार आहोत. - अश्विन व्हटकर, सहायक अभियंता, महावितरण

Web Title: ..then lives would have been saved, Three victims of Vanamore family in Mhaisal due to electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.