...तर नगरसेवकाने सांडपाण्यात अंघोळ करावी; शामरावनगरच्या प्रश्नावर नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांचे आवाहन
By अविनाश कोळी | Published: June 1, 2023 01:40 PM2023-06-01T13:40:42+5:302023-06-01T13:41:11+5:30
शामरावनगर परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटल्याचा याठिकाणच्या नगरसेवकाचा दावा
सांगली : शामरावनगर परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटल्याचा दावा याठिकाणचे नगरसेवक करीत आहेत. येत्या पावसाळ्यात जर सांडपाणी साचून राहिले तर त्याच सांडपाण्यात संबंधित नगरसेवकांनी अंघोळ करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शैलेश पवार व नागरिकांनी केले आहे.
यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १८ मधील नगरसेवकांकडून सोशल मिडियाद्वारे दिशाभूल सुरु आहे. पूरग्रस्त व सांडपाणीग्रस्त असणारे शामरावनगर कायमस्वरूपी सांडपाणीमूक्त झाल्याची घोषणा नगरसेवक करीत आहेत. येणाऱ्या पावसाळ्यात जर शामरावनगरमध्ये सांडपाणी चरीत, डबक्यात साचून राहिले व नागरिकांच्या घरामध्ये शिरले, तर घोषणा करणाऱ्या नगरसेवकाने स्वतःहून त्या सांडपाण्यामध्ये अंघोळ करावी, अशी नागरिकांची इच्छा आहे.
नगरसेवकाने केलेली घोषणा व प्रत्यक्षातील परिस्थिती फार वेगळी आहे. काढलेल्या चरीत पाणी साचून राहत आहे. सांडपाणी पुढे सरकत नाही. त्याला पुढे जाण्यास कोणत्याही प्रकारची वाट नाही. तरी हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, यासाठी महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.
पत्रकावर पृथ्वीराज पवार, पंडित पाटील, रणजित पाटील, सौरभ पवार, शुभम मोहिते, सागर पवार, जितेंद्र भालेकर, अमृत सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.