मग शरद पवार यांच्या घरी कशाला जाता? : जयंत पाटील; उद्धव ठाकरे यांना टोला; १२ रोजी नागपूर विधानसभेवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 08:44 PM2017-11-27T20:44:02+5:302017-11-27T20:46:47+5:30
इस्लामपूर : शरद पवार यांनी शिवसेनेला शिकवू नये म्हणता, मग त्यांच्या घरी सल्ला घेण्यासाठी कशाला जाता? तुम्ही भाजपची साथ सोडल्यानंतर तेथे कोण बसणार, याची चिंता तुम्ही करू नका, असा टोला माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी मारला
इस्लामपूर : शरद पवार यांनी शिवसेनेला शिकवू नये म्हणता, मग त्यांच्या घरी सल्ला घेण्यासाठी कशाला जाता? तुम्ही भाजपची साथ सोडल्यानंतर तेथे कोण बसणार, याची चिंता तुम्ही करू नका, असा टोला माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी मारला. राष्ट्रवादीच्यावतीने १ डिसेंबरला यवतमाळ येथून दिंडी आंदोलन छेडणार आहे, तर १२ डिसेंबरला नागपूर विधानसभेवर हल्लाबोल मोर्चाने धडक देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
इस्लामपूर येथील तहसीलदार कार्यालयावर वाळवा तालुका राष्ट्रवादीच्यावतीने आ़ पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाढती महागाई व शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासमोर ते बोलत होते़
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सौ़ छाया पाटील, तालुकाध्यक्ष विजय पाटील, युवक अध्यक्ष संग्राम पाटील, महिला तालुकाध्यक्षा सौ़ सुस्मिता जाधव, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, शंकर चव्हाण, सुभाष सूर्यवंशी सहभागी झाले होते़ तहसीलदार नागेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
जुन्या कचेरी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून हल्लाबोल मोर्चाची सुरुवात झाली़ यल्लम्मा चौक, गांधी चौक, संभाजी चौक, आझाद चौक, झरी नाका, पंचायत समितीमार्गे तहसीलदार कचेरीवर मोर्चाने धडक दिली़
तेथे आ़ पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेक इन महाराष्ट्र’च्या माध्यमातून राज्यात किती नवी गुंतवणूक आणली आणि आपण राज्यातील किती युवकांना रोजगार दिला, हे एकदा जाहीर करावे़ गृहमंत्री असूनही सांगली जिल्'ाच्या दौºयावर आल्यानंतर त्यांना अनिकेत कोथळेच्या कुटुंबास भेटण्यास वेळ मिळाला नाही. सध्या सरकारकडे वीज प्रकल्पांसाठी कोळसा घेण्यासही पैसा नाही़ आमच्या सरकारने या राज्याला भारनियमनातून मुक्त केले़ आता हे सरकार पुन्हा भारनियमनाकडे राज्याला घेऊन चालले आहे़ राज्यातील तूरडाळीच्या आधारभूत दराचा प्रश्न गंभीर असताना, पंतप्रधान मोदी यांनी मोझॅँबिक देशातून एक लाख टन तूरडाळ आयात केली आहे़ हा शेतकºयांना खड्ड्यात घालण्याचा डाव आहे.
डांगे म्हणाले, राज्यातील ३६ सूतगिरण्या बंद पडल्या आहेत़ विजेचा दर विदर्भासाठी वेगळा, तर महाराष्ट्रासाठी वेगळा लावला जात आहे़ हे सरकार कारभार करण्याच्या लायकीचे नसून, त्यांना सत्ता सोडायला भाग पाडू.
विजय पाटील, सौ़ छाया पाटील, संग्राम पाटील, सौ़ सुस्मिता जाधव, महिला शहराध्यक्षा सौ़ रोझा किणीकर, माजी पं़ स़ सदस्य प्रमोद आवटी, तांबव्याचे ब्रह्मनाथ पाटील, विद्यार्थी संघटनेचे विशाल सूर्यवंशी, जुबेर खाटीक, पोखर्णीचे अशोक वायदंडे, माजी सरपंच नामदेव देवकर, सौ़ पुनम सावंत, तांदुळवाडी यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
कुंडलिक पाटील यांनी प्रास्ताविक केले़ प्रा़ शामराव पाटील, विनायक पाटील, सभापती आनंदराव पाटील, बाळासाहेब पाटील, बी़ के. पाटील, विष्णुपंत शिंदे, देवराज पाटील, दूध संघाचे माजी अध्यक्ष नेताजीराव पाटील, भीमराव पाटील, उपसभापती नेताजी पाटील, जि़ प़ सदस्या सौ़ संगीता पाटील, संजीव पाटील, सौ़ संध्याताई पाटील, धनाजी बिरमुळे, लिंबाजी पाटील, सुहास पाटील, विकास कदम, सौ़ मेघा पाटील, बाळासाहेब लाड मोर्चात सहभागी झाले होते़ संजय पाटील यांनी आभार मानले.
इतरांच्या ‘आयाती’साठी भाजप नेते भीक मागताहेत...दिसेल त्याला आपल्या पक्षात घेणे हा भाजपचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे़ त्यांनी भीक मागितली नाही, असा राज्यात एकही तालुका राहिला नसेल़ २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निभाव लागणार नसल्याने दुसºया पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी हे धडपडत आहेत़ त्यांना जनतेच्या प्रश्नांचे काहीही देणे-घेणे नाही, असाही टोला आ. जयंत पाटील यांनी लगावला.
शासनविरोधी घोषणा
उन्हाचा तडाखा लागत असतानाही, हलगी-घुमक्याचा निनाद, गळ्यात पक्षाचे स्कार्फ, हातात झेंडे व शासनविरोधी फलक घेतलेल्या ज्येष्ठ, महिला, युवक व शेतकºयांनी तहसील कार्यालय परिसरात झालेल्या जाहीर सभेत शासनविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला़ या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती़
फोटो
इस्लामपूर येथे तहसीलदार नागेश पाटील यांना माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी अण्णासाहेब डांगे, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, बी. के. पाटील, संग्राम पाटील, सुस्मिता जाधव, छाया पाटील व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.