संख तहसीलमध्ये ६७ गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 11:57 PM2017-08-12T23:57:17+5:302017-08-12T23:57:17+5:30

There are 67 villages in Sankh tehsil | संख तहसीलमध्ये ६७ गावांचा समावेश

संख तहसीलमध्ये ६७ गावांचा समावेश

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जत तालुक्याच्या विभाजनाचा पूर्व टप्पा म्हणून संख तालुक्यातील अपर तहसीलदार कार्यालयावर राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. अप्पर तहसीलदार, नायब तहसीलदारांसह अधिकारी व कर्मचाºयांची सात पदेही मंजूर झाली आहेत. याबाबतचा अध्यादेश जिल्हा प्रशासनास मिळाला आहे. संखच्या लोकांनी स्वागत केले असून, उमदी आणि माडग्याळमध्ये नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा भडका उडाला आहे. दरम्यान, उमदीतील लोक संख गावात पाणीही पित नाहीत, त्यामुळे या कडव्या संघर्षाला जुनी पार्श्वभूमी आहे. हा सामाजिक वाद मिटविण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
जत तालुक्यातील गावांची संख्या आणि भौगोलिक क्षेत्र मोठे असल्यामुळे जत तालुक्याचे विभाजन करण्याची फार दिवसांपासून ग्रामस्थांची मागणी आहे. विभाजन करताना संख, उमदी की माडग्याळ हा वाद पेटला आहे. उमदी येथे तीव्र आंदोलन, तर माडग्याळमध्ये कालच गाव बंद आंदोलन झाले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने संखमध्येच अपर तहसीलदार कार्यालय सुरु करण्याच्या निर्णयावर उपसचिव कि. पां. वडते यांच्या सहीने आदेश निघाल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जतचे विभाजन करून नवीन तालुका निर्मितीला अवधी आहे. त्याआधी प्रशासकीय सोयीसाठी अपर तहसीलदार कार्यालय मंजूर झाले आहे. त्यासाठी सामाजिक संघटनांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. मागील अधिवेशनात आमदार विलासराव जगताप यांनी जत तालुक्याच्या विभाजनाचा विषय मांडला होता. भाजप सरकारने तूर्त विभाजन शक्य नसल्याने तत्काळ अपर तहसीलदार कार्यालयासाठीचे प्रस्ताव मागवले होते.
जतचे विभाजन करताना नव्या तालुक्याची सीमारेषा ठरविण्यात आली. नवीन अप्पर तहसील कार्यालयात जवळपास ६७ गावांचा समावेश होणार होता. यामुळे या गावांच्या सोयीचे उमदी, संख, माडग्याळ यापैकी कोणते सोयीचे आहे, याचा जिल्हा प्रशासनाने विचार करून राज्य शासनाकडे संख अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव पाठविला होता. उमदी हे सोलापूर, कर्नाटक सीमेवर असल्याने मागे पडले तर माडग्याळ हे नव्या तालुक्याच्या सीमेवरच असल्याने त्याचाही विचार झाला नाही. अखेर संखच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आले.
जत तालुक्यात सध्या आठ महसुली मंडल आहेत. यापैकी संख अप्पर तहसीलदार कार्यालयामध्ये चार महसूल मंडलांचा समावेश केला आहे. यामध्ये संख (गावे २२), उमदी (गावे १८), माडग्याळ (गावे १४) आणि मुचंडी (गावे १३) अशा ६७ गावांचा समावेश केला आहे. जत तहसीलदार कार्यालयाकडे चार महसूल मंडलांचा समावेश केला आहे.
संखला अप्पर तहसील कार्यालय मंजूर होऊन तसा आदेश आल्यामुळे माडग्याळ, उमदी येथील नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. उमदी स्वतंत्र तालुका करावा, यासाठी गेली अनेक वर्षे संघर्ष सुरू आहे. संख व उमदीमध्ये धार्मिक वाद असल्याचे सांगितले जाते. उमदीतील लोक संख गावात पाणी पित नाहीत. त्यामुळे अनेक अडचणी येतील, असा मुद्दा रेटला जात आहे.
दोन्ही गावातील भावनिक आणि सामाजिक वाद जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन कसे सोडविणार आहे, अशीही जत तालुक्यात चर्चा आहे. माडग्याळ ग्रामस्थांनी तालुक्याचा दर्जा मिळावा, यासाठी आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला किती यश मिळेल, हे आगामी काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
निर्णयाचे जल्लोषात स्वागत : ग्रामपंचायतीत अभिनंदनाचा ठराव
संख : संख (ता. जत) येथे स्वतंत्र नवीन अप्पर तहसील कार्यालय करण्याचा अध्यादेश जाहीर केला. यामुळे तालुका निर्मितीला गती मिळणार आहे. या निर्णयाचे परिसरातील लोकांनी फटाके फोडून, पेढे वाटून, गुलाल उधळून आनंद साजरा केला. ग्रामपंचायतीने शासनाच्या अभिनंदनाचा ठराव ग्रामसभेत केला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याची वाढती लोकसंख्या, मोठे क्षेत्रफळ, झालेले नागरीकरण, दुष्काळग्रस्त भाग आदीमुळे सध्याच्या जत तहसील कार्यालयावर मोठा ताण पडत असल्यामुळे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने जिल्ह्यातील संख येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या ठिकाणी एक अप्पर तहसीलदार कार्यालय, अव्वल कारकुन १ पद, लिपिक - टंकलेखक ३ पदे अशी पाच पदे नेमण्याचा विभागीय आयुक्त, पुणे यांनी आदेश दिला. अप्पर तहसील कार्यालयासाठी ४ मंडल कार्यालये व ६७ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये संख मंडल २२ गावे, उमदी १८ गावे, माडग्याळ १४ गावे, मुचंडी १३ गावे असा समावेश करण्यात आला आहे. संख येथे अप्पर तहसील कार्यालयाची घोषणा होताच ग्रामस्थांनी जल्लोष करून फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. संखमधील लोकांनी काल सांगली येथे जाऊन जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना निवेदन देऊन तातडीने यावर शिक्कामोर्तब करा, अशी मागणी केली. अप्पर तहसील कार्यालय झाल्याने गावांची सोय होईल, प्रशासकीय कामे, कागदपत्रे, जातीचे दाखले व इतर कामांसाठी जतचा हेलपाटा वाचेल. वेळ, श्रम, पैशाची बचत, जादा निधी उपलब्ध होईल, अनेक प्रश्न सुटतील, दुष्काळी भागाला न्याय मिळेल.
संख कार्यालयातील मंजूर पदे
अप्पर तहसीलदार एक, टंकलेखक एक, नायब तहसीलदार एक, अव्वल कारकुन एक आणि लिपिक-टंकलेखक तीन अशी सात पदे मंजूर झाली आहेत. यापैकी नायब तहसीलदार, टंकलेखक आणि लिपिकाची तीन अशी पाच पदे विभागीय आयुक्तांनी सांगली जिल्ह्यातील तहसील कार्यालयातूनच संख अप्पर तहसील कार्यालयासाठी उपलब्ध करून द्यावीत, अशी सूचनाही राज्य शासनाने दिली आहे.

Web Title: There are 67 villages in Sankh tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.