जतच्या यात्रेत पाच लाख भाविक
By admin | Published: January 6, 2016 11:48 PM2016-01-06T23:48:48+5:302016-01-07T00:59:19+5:30
छबिना फेऱ्यांनी सांगता : यात्रेच्या निमित्ताने दहा कोटींची उलाढाल
जत : पालखी मिरवणूक, छबिना फेऱ्या व किच कार्यक्रमाने जत येथील यल्लम्मादेवी यात्रेची बुधवारी सांगता झाली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील सुमारे पाच लाख भाविकांनी यात्रेत उपस्थिती लावली. करमणुकीची साधने, जनावरांची खरेदी-विक्री व एसटी बस वाहतूक या माध्यमातून यात्रेमध्ये सुमारे आठ ते दहा कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.
बुधवारी सकाळी सहाच्या दरम्यान यल्लम्मा देवीची पालखी सवाद्य मिरवणुकीने संस्थानिक डफळे यांच्या राजवाड्यावर गेली. तेथे देवीची पूजा, ओटी भरण झाल्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. जत शहरातील ठराविक मानकऱ्यांच्या घरी पूजा झाल्यानंतर पालखीच्या मार्गावरून पुजारी सुभाष कोळी (पुजारी) मंदिरात आले. तेथे त्यांनी अश्वारूढ पूजा केल्यानंतर मंदिराभोवती पालखी मिरवणुकीच्या आणि छबिन्याच्या पाच फेऱ्या काढण्यात आल्या. यावेळी उपस्थित लाखो भाविकांनी ‘उदे ग आई यल्लम्माऽऽ’ असा जयघोष केला. भंडारा-खोबऱ्याची उधळण केली. त्यामुळे संपूर्ण परिसर भंडाऱ्यात न्हाऊन निघाला होता. भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते.
छबिना फेऱ्या व पालखीची मिरवणूक झाल्यानंतर पुजारी सुभाष कोळी यांनी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते सवाद्य मिरवणुकीने किच कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले. तेथे मानकरी अरुण शिंदे यांनी बकऱ्याचा प्रतिकात्मक बळी दिला. त्यानंतर कोळी यांनी पालखीसमवेत अग्निप्रवेश केला व त्यानंतर यात्रेची सांगता झाली. संस्थानिक श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी तसे जाहीर करून, पुढच्या यात्रेची घोषणा केली.
नगरसेवक महादेव कोळी, परशुराम मोरे, माजी सरपंच सलीम गवंडी, संस्थानिक श्रीमंत शार्दुलराजे डफळे आदी यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)
तीन तास वाहनांच्या रांगा...
भाविकांच्या परतीच्या प्रवासाने सर्वच रस्त्यांवर दोन-तीन तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. किच कार्यक्रमाच्या ठिकाणी लकडकोट व्यवस्थित बांधले नव्हते. याशिवाय तेथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे भाविकांची रेटारेटी झाली. तेथे गोंधळ उडाला होता. परंतु स्वयंसेवकांनी परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.