राजकारणात शत्रूचे मित्र अन् मित्राचे शत्रू होताहेत - नीलम गोऱ्हे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 12:45 PM2024-10-09T12:45:39+5:302024-10-09T12:46:58+5:30

महिलांवरील अत्याचार रोखण्याची जबाबदारी सर्वांची

there are friends of enemies and enemies of friends In politics says Neelam Gorhe  | राजकारणात शत्रूचे मित्र अन् मित्राचे शत्रू होताहेत - नीलम गोऱ्हे 

राजकारणात शत्रूचे मित्र अन् मित्राचे शत्रू होताहेत - नीलम गोऱ्हे 

सांगली : गेल्या दहा वर्षांच्या काळात राजकारणात मोठे बदल होत आहेत. राजकारणाचा रोख, पद्धती बदलत चालली आहे. शत्रूचे मित्र अन् मित्राचे शत्रू होताना दिसताहेत, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

त्या म्हणाल्या की, मी अनेक निवडणुका पाहिल्या, पण दहा वर्षांत राजकीय बदल वेगाने झाले आहेत. दर तीन दिवसांनी राजकारण बदलत आहे. राजकीय शक्तींची कार्यपद्धतीही बदलत आहे. अशा स्थितीत प्रत्येक निवडणुकीत राजकीय परिणाम वेगवेगळे दिसून लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीतही असेच बदल दिसतील.

महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत त्या म्हणाल्या की, या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी सर्वच घटकांची आहे. तरीही पोलिसांनी निर्जन ठिकाणी गस्त वाढवावी. नदीकाठ, समुद्रकाठ किंवा टेकड्यांवरही पोलिसांनी भेटी दिल्या पाहिजेत. बऱ्याच उपाययोजना करता येतात. राज्यातील शाळांमध्ये काही अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर शिक्षकांची चारित्र्य तपासणी, शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्याची अंमलबजावणीही सुरू आहे. याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईसुद्धा केली जाईल. परिवहन, शिक्षण, पोलिस, समाजकल्याण, बालकल्याण विभागाच्या बैठकाही सातत्याने व्हायला हव्यात. अश्लीलतेचे उदात्तीकरण, देहप्रदर्शनाला बळ या गोष्टी थांबायला हव्यात.

दया, कीव म्हणून योजना नाही

महिलांप्रती दया किंवा कीव म्हणून लाडकी बहीण योजना आणलेली नाही. त्यांना आर्थिक बळ देण्याचा उद्देश आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावांमध्ये वडिलांसह आईचे नाव लावण्याचा उपक्रमही महिला सन्मानार्थच आहे, असे गोऱ्हे यांनी सांगितले.

जलदगतीने निकाल हवेत

महिला अत्याचाराची प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवावीत, त्यांचे निकाल तातडीने लागावेत, अशी अपेक्षा सातत्याने व्यक्त केली आहे. सरकार याबाबत गांभीर्याने पावले उचलत आहे, असे गोऱ्हे म्हणाल्या.

योजनांबाबत चांगला प्रतिसाद

लाडकी बहीण, वयोश्री योजनेसह सर्व शासकीय योजनांबाबत सामान्य माणसांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शिवसेना नेत्यांकडून सध्या मतदारसंघाचे दौरे सुरू आहेत. माझ्याकडेही काही मतदारसंघाची जबाबदारी आहे. लोकांशी संवाद साधून आम्ही आमचा अहवाल देत आहोत, अशी माहिती गोऱ्हे यांनी दिली.

Web Title: there are friends of enemies and enemies of friends In politics says Neelam Gorhe 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.