भोसे लूटमारप्रकरणी अद्याप धागेदोरे नाहीत
By Admin | Published: February 1, 2016 01:09 AM2016-02-01T01:09:31+5:302016-02-01T01:09:31+5:30
रात्रीची गस्त सुरू : तपासासाठी दोन पथके
मिरज : तालुक्यातील भोसे येथे सहा ठिकाणी झालेली जबरी चोरी व दरोड्याप्रकरणी अद्याप पोलिसांना धागेदोरे सापडलेले नाहीत. चोरट्यांच्या तपासासाठी दोन पोलीस पथकांची निर्मिती करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक विजय मराठे यांनी सांगितले.
भोसे येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी ग्रामस्थांना मारहाण करून सहा घरांतील सुमारे आठ लाखाचा ऐवज लंपास केला. सहा ते सात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लूटमार करीत पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे. प्रतिकार करणाऱ्या दोघांना चोरट्यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. दरोड्याच्या घटनेमुळे भोसे परिसरात घबराट असून पोलिसांनी रात्रीच्यावेळी गस्त सुरू केली आहे. भोसेत धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांच्या शोधासाठी दोन पोलीस पथकांची निर्मिती करून जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची चौकशी करण्यात येत आहे. ऊस तोडीच्यानिमित्ताने आलेल्या टोळीतील काही जणांनी गुन्हा केला आहे काय, याची पडताळणी करण्यात येत आहे. चोरटे पंढरपूर महामार्गावरून वाहनाने पसार झाल्याचा अंदाज आहे.
मराठीत बोलणाऱ्या चोरट्यांनी काही बंद घरांचे दरवाजे मोडून काढले, तर काही ठिकाणी हाका मारून दरवाजा उघडण्यास भाग पाडले. घरातील कुटुंबियांना दरडावून चाकूच्या धाकाने मौल्यवान ऐवज लुटला. लूटमार करून घराला कड्या लावून कोंडून घातले. अशा पध्दतीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची चौकशी सुरू आहे. अद्याप पोलिसांना धागेदोरे सापडलेले नाहीत. (वार्ताहर)