जुन्या नोटा बदलण्याचे अद्याप आदेशच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:26 AM2021-01-25T04:26:35+5:302021-01-25T04:26:35+5:30
सांगली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या महाव्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार चलनातून १००, १० व ५ रुपयांच्या जुन्या मालिकेतील नोटा मार्च-एप्रिलनंतर ...
सांगली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या महाव्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार चलनातून १००, १० व ५ रुपयांच्या जुन्या मालिकेतील नोटा मार्च-एप्रिलनंतर हटविण्यात येणार आहेत. मात्र, फेब्रुवारी महिना तोंडावर आला तरी अद्याप त्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. दुसरीकडे या जुन्या नोटांवरून व्यापारी व ग्राहकांत खटके उडत आहेत. ऐनवेळी आदेश आले तर पुन्हा या नोटा जमा करण्यासाठी लोकांना बँकांमध्ये रांगा लावाव्या लागतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी जुन्या नोटा हटविण्याबाबत माहिती दिल्यानंतर सर्वत्र नोटांबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. अद्याप अग्रणी बँकेला कोणतेही आदेश आले नाहीत. दुसरीकडे या नोटांबाबत ऐनवेळी आदेश आले तर त्या जमा करण्यासाठी गाेंधळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांत या आदेशावरून चिंता व्यक्त केली जात आहे. किरकोळ व्यापारी, फेरीवाले, कामगार व गोरगरीब नागरिकांकडे अशा नोटांचे प्रमाण अधिक असल्याने व्यापाऱ्यांनी त्याबाबत विनाअट पुरेशा मुदतीत त्या बदलून देण्याची मागणी केली आहे.
चौकट
बँकांमध्येही जुन्या नोटांचे व्यवहार
एकीकडे रिझर्व्ह बँकेने या नोटा रद्दचे संकेत दिले असले तरी बँकांमधून अद्याप या नोटा वितरित केल्या जात आहेत. नोटा बदलून देण्याची प्रक्रिया अद्याप नाही. अनेक ग्राहकांकडून नोटा बदलून मिळण्याविषयी विचारणा केली जात आहे.
चौकट
बँकासुद्धा अनभिज्ञ
जिल्ह्यातील काही बँक व्यवस्थापकांनी याबाबत आम्हाला कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे सांगितले. नोटा कधी बंद होणार, त्यांचे व्यवहार सुरू ठेवायचे की नाही, नोटा बदलून द्यायच्या का, अशा कोणत्याही गोष्टीबाबत आदेश नसल्याने बँका अनभिज्ञ आहेत.
कोट
हजार आणि पाचशेच्या नोटा अचानक रद्द करून केंद्र शासनाने यापूर्वी जनतेचे हाल केले आहेत. आता पुन्हा असे हाल करू नयेत. सध्या व्यापारात या नोटांमुळे कोणतीही समस्या नाही. त्यामुळे नोटा बदलण्यासाठी पुरेसा वेळ रिझर्व्ह बँकेने दिला पाहिजे
-मुसाभाई सय्यद, अध्यक्ष जुनी भाजी मंडई, व्यापारी असोसिएशन
कोट
शासनाने आता हे नोटांचे खेळ जनतेच्या त्रासाचे करू नयेत. विनाअट नोटा परताव्याच्या व बदलाच्या अपेक्षा आहेत. ऐनवेळी आदेश काढून लोकांना रांगेत उभे करून त्यांना त्रास होईल, अशी कृती होऊ नये.
- समीर शहा, अध्यक्ष व्यापारी एकता असोसिएशन