जिल्हा परिषदेच्या सभेसाठी सदस्यांकडून प्रश्नच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:30 AM2021-08-12T04:30:59+5:302021-08-12T04:30:59+5:30
सांगली : जनतेच्या समस्या सुटत नाहीत म्हणून ऑफलाइन सभेसाठी टाहो फोडणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांनी सभेसाठी प्रश्नच विचारलेले नाहीत. सर्वसाधारण ...
सांगली : जनतेच्या समस्या सुटत नाहीत म्हणून ऑफलाइन सभेसाठी टाहो फोडणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांनी सभेसाठी प्रश्नच विचारलेले नाहीत. सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. ११) प्रत्यक्ष सभागृहात होत आहे, त्यासाठी प्रशासनाकडे फक्त चार प्रश्न दाखल झाले आहेत.
आतापर्यंतच्या ऑफलाइन सभेसाठी प्रत्येक वेळी सरासरी ३० ते ४० प्रश्न दाखल व्हायचे. गेल्या ऑनलाइन सभेसाठीदेखील १५ ते २० प्रश्न दाखल झाले होते. उद्याची सभा प्रत्यक्ष सभागृहात होणार असूनही सदस्यांनी अळीमिळी गुपचिळीचे धोरण स्वीकारल्याचे दिसते. गेल्या वेळची सभा ऑनलाइन झाल्याने सदस्यांनी आकाशपाताळ एक केले होेते. काही जणांनी सभागृहात शिरण्याचा प्रयत्न केला होता, तर काहींनी जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवरच धरणे धरले होते. त्यामुळे अध्यक्षांना सभा पूर्णवेळ चालविता आली नव्हती. कोणत्याही गंभीर प्रश्नावर चर्चा न होताच सभा संपवावी लागली होती.
आजची सभा प्रत्यक्ष सभागृहात होत आहे; पण सदस्यांनी त्यासाठी प्रश्नच दिलेले नाहीत. जनतेच्या समस्या जणू संपल्या असाव्यात, अशी शंका येण्याजाेगी स्थिती आहे.
दरम्यान, अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह पदाधिकारी बदलासाठी भाजपच्या एका गटासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक आहेत. त्याचे पडसाद या सभेत उमटण्याची शक्यता आहे. बदल्या, पदोन्नत्या, कोरोनाचा खर्च, महापुरातील हानी आदी विषयांवर वादळी चर्चेची शक्यता आहे. या ऐनवेळच्या प्रश्नांआडून अध्यक्षांना खिंडीत पकडण्याची व्यूहरचना विरोधकांकडून होऊ शकते.