वरिष्ठ डॉक्टर नसतात रुग्णालयात, रुग्णांचा जीव ‘शिकाऊं’च्या हातात 

By संतोष भिसे | Published: October 12, 2023 03:56 PM2023-10-12T15:56:05+5:302023-10-12T15:58:34+5:30

अधिष्ठात्यांच्या पाहणीत धक्कादायक निरीक्षणे, विभाग प्रमुखांनी वेळापत्रक देण्याची सूचना

There are no senior doctors in the hospital, A learned doctor Inspection the patients | वरिष्ठ डॉक्टर नसतात रुग्णालयात, रुग्णांचा जीव ‘शिकाऊं’च्या हातात 

वरिष्ठ डॉक्टर नसतात रुग्णालयात, रुग्णांचा जीव ‘शिकाऊं’च्या हातात 

संतोष भिसे

सांगली : वरिष्ठ जबाबदार डॉक्टर गायब आणि रुग्णांचा जीव शिकाऊ कनिष्ठ डॉक्टरांच्या हातात, असा धक्कादायक प्रकार सांगली, मिरज व तासगाव शासकीय रुग्णालयांत आढळला आहे. खुद्द अधिष्ठात्यांच्या पाहणीमध्येच हा सावळागोंधळ आढळला असून, यासंदर्भात त्यांनी डॉक्टरांना खरमरीत पत्र काढले आहे.

नांदेड, नागपूर, ठाणे रुग्णालयांतील मृत्यूसत्रानंतर अन्य शासकीय रुग्णालयांच्याही कामकाजाचा आढावा शासन घेत आहे. यादरम्यान, सांगली, मिरज व तासगाव शासकीय रुग्णालयांत खुद्द अधिष्ठात्यांनीच झाडाझडती घेतली. वरिष्ठ डॉक्टरांच्या कामकाजाविषयी महाविद्यालय परिषदेच्या बैठकांतही चर्चा झाली. त्यावेळी अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. सर्जिकल अतिदक्षता विभाग, मेडिसीन अतिदक्षता विभाग, नवजात अर्भकांचा अतिदक्षता विभाग व आकस्मिक दुर्घटना विभागात पाहणीवेळी फक्त एक किंवा दोन कनिष्ठ निवासी डॉक्टर आढळले.

रुग्णाच्या जीविताची खऱ्या अर्थाने जबाबदारी असलेले वरिष्ठ निवासी डॉक्टर किंवा सहायक प्राध्यापक सहसा उपस्थित नसतात. त्यामुळे अनेकदा रुग्णाच्या जीवाशी खेळ केल्याचा प्रकार होतो. काहीवेळा रुग्णाच्या तपासणीनंतर रोगनिदान होईपर्यंत, त्याला अपघात वैद्यकीय विभागातच बसवून ठेवले जाते. कधीकधी तब्बल पाच तासांपर्यंत पुढील उपचारांच्या प्रतीक्षेत थांबवून ठेवले जाते.

वास्तविक सर्व प्रकारच्या अतिदक्षता, अपघात विभागातील गंभीर व अतिगंभीर रुग्णांची सखोल तपासणी आवश्यक आहे. वरिष्ठ निवासी डॉक्टर, सहायक प्राध्यापक किंवा पथक प्रमुखांनी स्वत: तपासून उपचार करण्याचे निर्देश आहेत; पण त्याऐवजी कनिष्ठ निवासी डॉक्टरांकडे रुग्ण सोपविला जातो. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये महाविद्यालयीन परिषदेच्या बैठकांत अधिष्ठात्यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या होत्या. शल्यचिकित्साशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र व औषध वैद्यकशास्त्र विभागांच्या प्रमुखांना स्पष्टपणे सांगितले होते. तरीही कार्यवाही झाली नाही. परिणामी, त्यांनी कामाचे सुस्पष्ट वेळापत्रक सादर करावे, असे आदेश अधिष्ठात्यांना द्यावे लागले.

आदेशात म्हटले आहे की, सर्व चिकित्सालयीन व तातडीच्या रुग्णसेवेशी संबंधित विभाग प्रमुखांनी वेळापत्रक द्यावे. बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभाग येथील दररोजच्या कामाचे वेळापत्रक सादर करावे. त्यात मोबाइल क्रमांकही नोंद असावा. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे असेच वेळापत्रक वैद्यकीय अधीक्षकांनी सादर करायचे आहे. वेळापत्रकाचा आठवडा संपण्यापूर्वी एक दिवस अगोदर पुढील वेळापत्रक अधिष्ठात्यांच्या स्वीय सहायकाला द्यायचे आहे.

उद्रेक झाल्यास जबाबदार कोण?

अधिष्ठात्यांनी स्पष्ट केले की, डॉक्टरांच्या उपस्थितीअभावी एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास नातेवाइकांचा उद्रेक होऊ शकतो. त्यांनी तक्रार केल्यास किंवा कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास कारवाई करावी लागते. या स्थितीत डॉक्टरांचे वेळापत्रक आवश्यक आहे. पाहणीदरम्यान आढळलेल्या गंभीर व दखलपात्र बाबींच्या अनुषंगाने आदेश जारी करण्यात आले आहेत.

डॉक्टरांच्या कामाची धक्कादायक पद्धत

  • रुग्णांना अनेकदा वेळेत दाखल करून घेतले जात नाही.
  • कनिष्ठ निवासी डॉक्टरांकडे रुग्णाला सोपविले जाते.
  • तपासणीनंतर रोगनिदान होण्यासाठी पाच तासांपर्यंत रुग्णाला ताटकळत बसवून ठेवले जाते.
  • नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागासारख्या संवेदनशील विभागातही वरिष्ठ डॉक्टर अनेकदा नसतात.

Web Title: There are no senior doctors in the hospital, A learned doctor Inspection the patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.