पार्किंगसाठी आकारले जाते शुल्क, मात्र सुरक्षेची जबाबदारी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 02:43 PM2021-11-16T14:43:22+5:302021-11-16T14:44:28+5:30
सांगली शहरातील बाजारपेठेसह प्रमुख मार्गावरील वाहतुकीची कोंडी वाढतच चालली असताना, पार्किंगचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे.
सांगली : शहरातील बाजारपेठेसह प्रमुख मार्गावरील वाहतुकीची कोंडी वाढतच चालली असताना, पार्किंगचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. त्यातच बस स्थानक, रेल्वे स्थानकासह सार्वजनिक ठिकाणी लावलेली वाहनांना कोणीच वाली नसल्याचे चित्र असून, या ठिकाणी पार्किंगसाठी शुल्क आकारले जात असले, तरी त्याची सुरक्षेची जबाबदारी वाहनधारकांवर ढकलली जात आहे.
शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातही सार्वजनिक ठिकाणाहून चोरीचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयाच्या पार्किंगमधून वाहनचोरीच्या घटना वाढल्या आहेत. यासाठी कोणतीही सुरक्षा यंत्रणा कार्यरत नाही. बस स्थानक, रेल्वे स्थानकामध्ये मात्र, ठरावीक शुल्क अदा केल्याशिवाय वाहन पार्क करू दिले जात नाही. या ठिकाणी वाहन लावल्यानंतर अनेक वेळा काही वस्तू तर कधी दुचाकीच लंपास होत आहेत.
कोठे किती पार्किंग शुल्क?
बस स्थानक : मध्यवर्ती बस स्थानकावर वाहनांची मोठी गर्दी असल्याने, सहा तासाला रक्कम घेतली जाते.
रेल्वे स्थानक : पार्किंगमध्ये दहा रुपये स्वीकारले जातात. सध्या हळूहळू वाहनधारकांची गर्दी वाढत आहे.
मॉल : शहरातील मॉलमध्ये दुचाकीला १० रुपये घेतले जातात. मात्र, सुरक्षेची जबाबदारी घेतली जात नाही.
जबाबदारी वाहन मालकांचीच
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मध्यवर्ती बस स्थानकातील पार्किंग व्यवस्था सध्या विस्कळीत आहे, तरीही अनेक वाहनधारकांची वाहने पार्किंग भागात आढळून आली. या ठिकाणी सुरक्षेसाठी कर्मचारी नियुक्त आहे.
पार्किंग व्यवस्था करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता, आता वाहनांचीच संख्या इतकी वाढत आहे की, त्यावर लक्ष ठेवणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वाहनधारकांनीच अधिक दर्जेदार लॉकची सुविधा करून वाहनांची सुरक्षा बाळगावी, असेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
पार्किंगसाठी नियोजन आवश्यक
शहरातील प्रमुख मार्गावर वाहतुकीची समस्या जाणवत आहे. यासाठी पार्किंग व्यवस्था करण्यासाठी संबंधितांना सूचना देणार आहे. वाहनांची सुरक्षाही त्यांनीच घ्यावी, जेणेकरून चोरीच्या घटना घडणार नाहीत. - प्रज्ञा देशमुख, सहा.पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.