मिरज तालुक्यामधील कॉँग्रेसचा गोंधळ कायम

By Admin | Published: February 6, 2017 01:13 AM2017-02-06T01:13:51+5:302017-02-06T01:13:51+5:30

चर्चा फिसकटली : तालुकाध्यक्षांकडे एबी फॉर्म सुपूर्द

There is confusion of Congress in Miraj taluka | मिरज तालुक्यामधील कॉँग्रेसचा गोंधळ कायम

मिरज तालुक्यामधील कॉँग्रेसचा गोंधळ कायम

googlenewsNext

सांगली : कॉँग्रेसमधील दोन गटांच्या वादात मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारीचा गोंधळ रविवारीही कायम राहिला. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कॉँग्रेसमधील जागा वाटपाची चर्चाही यशस्वी होऊ शकली नाही. सोमवारी पुन्हा यासाठी बैठक होणार असली तरी, विशाल पाटील यांच्या गटाने तालुक्यातील जागा वाटपाचे पूर्ण अधिकार देण्याची मागणी केल्याने, तिढा कायम आहे.
वाद कायम ठेवून आ. मोहनराव कदम यांनी रविवारी मिरज तालुकाध्यक्ष अमर पाटील यांच्याकडे एबी फॉर्म दिले. उमेदवारी अर्ज भरण्याची सोमवारी अंतिम मुदत असल्याने मिरज तालुक्यातील वाद मिटविण्यासाठी रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा सुरू होती. कॉँग्रेस नेते आ. पतंगराव कदम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यात सांगलीत बैठक पार पडली. या बैठकीत स्वाभिमानी आणि काँग्रेसच्या आघाडीबाबत चर्चा करण्यात आली, मात्र या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील उपस्थित नव्हते. त्यामुळे कॉँग्रेसअंतर्गत वादात आघाडीची चर्चाही पूर्ण झाली नाही. सोमवारी पुन्हा स्वाभिमानी आघाडी व कॉँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी शनिवारी मिरज वगळता नऊ तालुकाध्यक्षांकडे एबी फॉर्म दिले होते. मिरज तालुक्यातील वादाचा मुद्दा रविवारी संपुष्टात येईल, असे नेत्यांना वाटत होते, परंतु वाद मिटविण्यात त्यांना यश आले नाही. रविवारी केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कदम यांच्यात चर्चा झाली. सोमवारी सकाळी पुन्हा याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
भाजपच्या उमेदवारांची यादी रविवारी प्रदेश कार्यकारिणीने अंतिम केली. सोमवारी अधिकृत यादी जाहीर होणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिली आहे. रविवारी पक्षाचे तालुकाध्यक्ष तसेच ज्याठिकाणी आमदार, खासदार आहेत, त्याठिकाणी त्यांच्याकडे एबी फॉर्म देण्यात आले आहेत. अंतिम झालेल्या यादीप्रमाणे संबंधित उमेदवारांना पक्षाचे अधिकृत अर्ज दिले जाणार आहेत. शिराळा, कडेगाव व पलूस येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी भाजपने युती केली आहे. वाळवा तालुक्यात विकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अन्य तालुक्यांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी त्यांनी केली आहे. ज्याठिकाणी आघाडी आहे, त्याठिकाणी मित्रपक्षांना जागा सोडल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: There is confusion of Congress in Miraj taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.