जिल्ह्यात दररोज पाच टन ऑक्सिजन राहतोय शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:36+5:302021-05-29T04:20:36+5:30

सांगली : जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने दररोज सरासरी पाच टन ऑक्सिजन शिल्लक राहू लागला आहे. कोरोनाच्या लाटेत ...

There is five tons of oxygen left in the district every day | जिल्ह्यात दररोज पाच टन ऑक्सिजन राहतोय शिल्लक

जिल्ह्यात दररोज पाच टन ऑक्सिजन राहतोय शिल्लक

Next

सांगली : जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने दररोज सरासरी पाच टन ऑक्सिजन शिल्लक राहू लागला आहे. कोरोनाच्या लाटेत घसरण होत असल्याचे हे संकेत असून जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

गुरुवारअखेर ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांची संख्या १,७०० पर्यंत खाली आली आहे. व्हेन्टिलेटरवरील रुग्णसंख्या २५७ झाली आहे. दहा दिवसांपूर्वी म्हणजे १७ मे रोजी ऑक्सिजनवर २,१३३ व व्हेन्टिलेटरवर ३०८ होते. महिनाभरापूर्वी ऑक्सिजनसाठी तडफडणारा जिल्हा आता अतिरिक्त साठा करु लागला आहे. गेल्या महिन्यात बेल्लारीहून सांगलीला होणारा ऑक्सिजन पुरवठा थांबल्याने जिल्ह्याची तडफड वाढली होती. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ताकद लावून पुणे व रायगड येथून ऑक्सिजन उपलब्ध केला. जिल्ह्याची दररोजची मागणी ५० टनांवर पोहोचली होती, त्यामुळे सांगलीसाठी ५४ टनांचा कोटा मंजूर करुन घेतला होता.

महिनाभर ऑक्सिजनचा पुरवठा अत्यंत सुरळीत झाला. रुग्णसंख्याही कमी होत गेली. गेल्या आठवडाभरात दररोजची नव्या रुग्णांची संख्या १२०० च्या जवळपास आहे. साहजिकच ऑक्सिजन पुरवठ्यावरील ताण कमी झाला आहे. सांगलीचा कोटा ५४ टनांवरुन ४९ टनांपर्यंत कमी करण्यात आला, तरीही पाच टन शिल्लक राहत आहे.

चौकट

गरज ४४ टनांची, पुरवठा ४९ टनाचा

जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांची सध्याची गरज दररोज ४४ टनांपर्यंत खाली आली आहे. दररोजचा पुरवठा मात्र ४९ टनांपर्यंत आहे. त्यामुळे दररोज पाच टन ऑक्सिजन शिल्लक राहू लागला आहे. तातडीच्या प्रसंगासाठी त्याचा साठ करुन ठेवण्यात येत असल्याची माहिती अन्न व अैाषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नितीन भांडारकर यांनी दिली.

चौकट

आता उद्योगांना संजीवनी द्या

रुग्णालयांची ऑक्सिजनची गरज भागल्याने आता उद्योगांनाही संजीवनी देण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे. रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरत नसल्याने दोन महिन्यांपासून उद्योगांचा पुरवठा पूर्णत: थांबवला होता. त्यामुळे अनेक उद्योगांचे कामकाज थंडावले आहे. फाऊन्ड्री, फॅब्रिकेशन आदी उद्योगांना मोठा फटका बसला आहे. त्यांनी आता ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

Web Title: There is five tons of oxygen left in the district every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.