Sangli: विश्वजीत कदम-संग्रामसिंह देशमुख आमने-सामने येणार?, पलूस येथे भाजपात बैठकांचा धडाका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 04:49 PM2024-09-19T16:49:52+5:302024-09-19T16:50:23+5:30
विनोद तावडे यांच्याकडून आढावा
इकबाल मुल्ला
पलूस : येत्या विधानसभा निवडणुकीचा बार नोव्हेंबर महिन्यात उडण्याची शक्यता आहे. हे गृहित धरून पलूस तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या महिन्यात भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी पलूस तालुक्याचा धावता दौरा करत काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी संग्राम देशमुख यांना तयारीला लागण्याचे संकेत दिले आहेत.
गेल्या आठवड्यात भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारूक जमादार यांनी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक कार्यकर्त्यांची माळवाडी (ता. पलूस) येथे आढावा बैठक घेतली. येथील प्रलंबित कब्रस्तान व दावल मलिक मदनशा दर्गा विकासासंदर्भात चर्चा केली. यावेळी ऋषी टकले, अमीर सलामत, आजम मकानदार, अस्लम अत्तार, इमानुल सुतार यांच्यासह भिलवडी व माळवाडी येथील नागरिक उपस्थित होते.
पलूस-कडेगाव मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीमध्ये येथील जागा शिवसेनेकडे गेल्याने पक्षाच्या आदेशानुसार संग्रामसिंह देशमुख यांना थांबावे लागले होते. परंतु, यावेळी भाजपाकडून संग्रामसिंह देशमुख यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत डॉ. विश्वजीत कदम-संग्रामसिंह देशमुख आमने-सामने येण्याची शक्यता आहे. तसेच मागील निवडणुकीत घेतलेल्या निर्णयाची पुनरावृत्ती न करता भाजपा निर्णयावर ठाम राहिली. तर पलूस-कडेगाव मतदारसंघात एकास एक लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
शरद लाड यांची भूमिका निर्णायक
क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांची पलूस-कडेगाव मतदारसंघामध्ये मोर्चेबांधणी केली आहे. कोणत्या पक्षाकडून लढणार हे निश्चित नाही. परंतु, ते महाविकास आघाडीसोबत जाणार की अन्य कोणती भूमिका घेणार? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र, मतदारसंघातील विजयी उमेदवारासाठी शरद लाड यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.