ग्राऊंड रिपोर्ट: मिरज सिव्हिल म्हणजे 'रात्रंदिन युद्धाचा प्रसंग'!; कधीही नांदेड, नागपूर, ठाणे होण्याचा धोका

By संतोष भिसे | Published: October 6, 2023 05:09 PM2023-10-06T17:09:30+5:302023-10-06T17:16:56+5:30

संतोष भिसे नांदेड, नागपूर आणि ठाणे रुग्णालयांतील मृत्यूकांडाने सरकारी रुग्णालयांतील अनास्था पुढे आली आहे. सांगली जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या मिरज ...

There is also a problem in patient care in the important Miraj Civil in Sangli district | ग्राऊंड रिपोर्ट: मिरज सिव्हिल म्हणजे 'रात्रंदिन युद्धाचा प्रसंग'!; कधीही नांदेड, नागपूर, ठाणे होण्याचा धोका

ग्राऊंड रिपोर्ट: मिरज सिव्हिल म्हणजे 'रात्रंदिन युद्धाचा प्रसंग'!; कधीही नांदेड, नागपूर, ठाणे होण्याचा धोका

googlenewsNext

संतोष भिसे

नांदेड, नागपूर आणि ठाणे रुग्णालयांतील मृत्यूकांडाने सरकारी रुग्णालयांतील अनास्था पुढे आली आहे. सांगली जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या मिरज सिव्हिलमधील रुग्णसेवेतही अशीच तारेवरची कसरत सुरू आहे. अपुरे मनुष्यबळ, औषधांचा तुटवडा, जुनाट उपकरणे या साऱ्यांचा सामना करत सिव्हिल रुग्णालय स्वत:ला आणि रुग्णांनाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतेय. `लोकमत`ने अनुभवलेला हा ऑंखो देखा हाल...

स्थळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज. वेळ : सकाळी १०.

रुग्णांच्या अशा आहेत व्यथा

  • रुग्ण : मिरजेतील १० वर्षांचा मुलगा. आजार : घशामध्ये जिवाणूजन्य संसर्ग. या आजारावरील औषधे उपलब्ध नसल्याचे सांगत सांगलीला शासकीय रुग्णालयात पाठविले.
  • रुग्ण : २५ वर्षे वयाची गर्भवती. आजार : प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्राव. उपचार : रक्तस्राव थांबविण्यासाठी इंजेक्शन. रक्तस्राव थांबविण्यासाठी वापरले जाणारे कार्बिटेक्स इंजेक्शन शासकीय यादीत नसल्याने रुग्णाच्या नातेवाइकांना चिठ्ठी देऊन मागविले जाते. ३५० रुपयांचा भुर्दंड.
  • रुग्ण : ४० वर्षांचा शेतकरी. आजार : अपघातात पायाला फ्रॅक्चर. उपाय : प्लास्टर करणे. दोन दिवसांपासून प्लास्टर संपल्याने रुग्णालाच बाहेरून आणावे लागले.
  • रुग्ण : ५५ वर्षीय महिला. आजार : सततचा खोकला. उपचार : एक्सरे काढला. एक्सरे काढला, पण संगणकांची अंतर्गत कनेक्टिव्हिटी नसल्याने रुग्णाच्या मोबाइलवरच फोटो काढून डॉक्टरांकडे पाठविला.
  • रुग्ण : ६५ वर्षांचा शेतकरी. त्रास : दातांमध्ये कीड. उपचार : कवळी बसविणे. दंतचिकित्सा विभागातील कवळीचे काम दोन वर्षांपासून बंद आहे. तेथील तंत्रज्ञांना केसपेपर काढण्यासारख्या तद्दन कारकुनी कामांना जुंपले. रुग्णाला सांगलीला शासकीय रुग्णालयात जावे लागले.
     

सर्वच विभागात रुग्णांचे हाल

  • स्थळ : आकस्मिक दुर्घटना विभाग. समस्या : स्वच्छतागृहाची. कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृहाची सोय, पण पाण्याअभावी कुलूप लावले.
  • स्थळ : रेडिओलॉजी विभाग. चाचणी : एमआरआय काढणे. रुग्णांना १५ दिवसांपासून महिन्याभरापर्यंतची प्रतीक्षा. या विभागातील एमआरआय यंत्र जुनाट बनावटीचे आहे. त्याची क्षमता ०.२ टेस्ला आहे. या तुलनेत सध्या अन्यत्र तब्बल ३ टेस्ला क्षमतेची यंत्रे वापरली जातात. कमी क्षमतेमुळे मिरज रुग्णालयात रुग्णांना ताटकळावे लागते.
  • स्थळ : रेडिओलॉजी विभाग. उपचार : सीटी स्कॅनिंग करणे. सीडी रायटर अनेकदा बंद पडतो. परिणामी चाचणी अहवाल कागदावर लिहून दिला जातो.
  • स्थळ : बाह्यरुग्ण विभाग. काम : केसपेपर काढण्याचे. रुग्णालयाचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज हाताळणारी एचएमआयएस ही ऑनलाइन कंत्राटी प्रणाली दोन वर्षांपासून बंद. शासनाने पुनरुज्जीवन न केल्याने कर्मचाऱ्यांवर ताण. हातानेच केसपेपर लिहिण्याचे काम.
     

जुने निवृत्त, नवी भरती नाही

चतुर्थ श्रेणी वर्गातील जुने कर्मचारी निवृत्त झाले, पण त्या जागी नव्याने भरती केली नाही. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांवर ताण येतो. सफाईचे काम निघते, तेव्हा `मामा` आणि `मावशी` अशा हाका मारून परिचारिका हैराण होतात.

ताण मोठा, कसरतही मोठी

मिरज रुग्णालयात सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव, विजापूर आदी जिल्ह्यांतील रुग्णांचा ताण आहे. उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळासह सर्वांना उपचार देण्यासाठी कसरतही तितकीच मोठी करावी लागते. १०० हून अधिक परिचारिकांची पदे रिक्त आहेत. पण प्रसंगी रजा, सुट्ट्यांचा बळी देऊन रुग्णसेवा अखंडित ठेवली जाते.

... तरीही मिरज म्हणजे नांदेड, ठाणे नव्हे

कर्मचाऱ्यांचा तुटवडा, सोयीसुविधांचा अभाव, जुनाट उपकरणे अशा अनेक समस्या असतानाही मिरज म्हणजे नांदेड, नागपूर किंवा ठाणे नव्हे ही दिलाशाची बाब ठरते. वैद्यकीय महाविद्यालय आणि सांगली रुग्णालय संलग्न असल्याने तातडीच्या व गंभीर प्रसंगी तज्ज्ञांची फौज कामाला लागते. कोरोनाकाळात सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी मिरज रुग्णालय देवदूत ठरले होते. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून चालविले जात असल्याने औषधांचा तुटवडा तितकासा गंभीर नाही.

दिलासा आहे..

पुरेसे डॉक्टर्स, तज्ज्ञांचे उपचार, बेड व औषधांची उपलब्धता, गुंतागुंतीच्या व जोखमीच्या शस्त्रक्रिया, वॉर्डातील स्वच्छता, रुग्णसेवेत झोकून देणारा स्टाफ, वारकरी अपघातासारखा कोणताही बाका प्रसंग निभावण्याची क्षमता व तयारी.

... पण संतापदेखील

परिसरातील अस्वच्छता, सुरक्षा बलासह काही कर्मचाऱ्यांची असहिष्णुता, तपासणी, चाचण्या, चाचण्यांचे अहवाल व पुन्हा तपासणी यातील वेळेचा अपव्यय परिणामी रुग्णांचे हेलपाटे, सतत बिघडणारी उपकरणे, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
 

Web Title: There is also a problem in patient care in the important Miraj Civil in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.