सांगली जिल्ह्यात शासनाच्या सात विभागांत लाचखोरीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 12:39 PM2024-06-17T12:39:39+5:302024-06-17T12:40:18+5:30
साडेपाच वर्षांतील चित्र; ‘घेणाऱ्याचा आणि देणाऱ्याचाही फायदा’ तत्त्व अमलात
घनशाम नवाथे
सांगली : शासनाच्या अनेक विभागांत टेबलाखालून आणि टेबलावरूनही लाच घेतली जाते. परंतु, असेही काही विभाग आहेत तेथे गेल्या साडेपाच वर्षांत लाचखोरीच झाली नाही. सहकार, आरटीओ, जीवन प्राधिकरण, रजिस्ट्रार, अपंग व वित्त महामंडळ, सार्वजनिक बांधकाम आणि कृषी खाते येथे लाचखोरीची तक्रारच नसल्यामुळे आश्चर्यच व्यक्त होत आहे.
‘लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार’ हे राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ब्रीदवाक्य आहे. तुमच्या हक्कासाठी लाच का? असा सवाल करत हा विभाग लाचखोरांना पकडून देण्याचे सातत्याने आवाहन करत असतो. शासकीय कामासाठी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याला सापळ्यात पकडून देता येते. तसेच लोकसेवकाने बेहिशोबी मालमत्ता गोळा केली असल्यास त्याचे पुरावे देऊनही कारवाई करता येते. लाचखोरीच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक, मोबाइल ॲप, वेबसाइटवर तक्रार नोंदवता येते. तसेच थेट भेटूनही तक्रार करता येते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर लाचेची मागणी केली आहे काय? याची प्रथम पडताळणी केली जाते. पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यास सापळा रचून लाचखोरांना पकडण्याची कारवाई केली जाते. लाचलुचपत विभागाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईत महसूल विभागात सर्वाधिक लाचखोरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या खालोखाल पोलिस दल, जिल्हा परिषद आदी विभागांत लाचखोरांवर कारवाई होते.
सांगली जिल्ह्यात शासनाच्या वेगवेगळ्या ३१ विभागांची यादी बनवली आहे. यातील सहकार, आरटीओ, जीवन प्राधिकरण, रजिस्ट्रार, अपंग व वित्त महामंडळ, सार्वजनिक बांधकाम आणि कृषी खाते या सात विभागांत २०१९ पासून लाचखोरीची कारवाईच झालेली नाही. ही माहिती वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल. परंतु, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालात हे चित्र दिसते. सहकार, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम, कृषी खाते, जीवन प्राधिकरण हे महत्त्वाचे विभाग आहेत. येथे नागरिकांचा कामानिमित्त थेट संबंध येतो. परंतु, ‘घेणाऱ्याचा आणि देणाऱ्याचा फायदा’ या तत्त्वामुळे लाचखोरीची तक्रारच गेल्या साडेपाच वर्षांत तरी झालेली दिसून येत नाही. एकप्रकारे ही आश्चर्याची बाबच म्हणावी लागेल.
येथे तक्रार करा
कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी होत असल्यास मोबाइल क्रमांक ९८२१८८०७३७ या क्रमांकावर तसेच टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२३३-२३७३०९५ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.