भाजपसारखं पुढचं बोलायची सवय नाही, जयंत पाटलांनी लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 01:01 PM2022-04-02T13:01:01+5:302022-04-02T13:02:07+5:30
सांगली : भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. जशा घडामोडी घडतील, तशी माहिती देऊ. आम्हाला भाजपसारखे पुढचे बोलायची ...
सांगली : भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. जशा घडामोडी घडतील, तशी माहिती देऊ. आम्हाला भाजपसारखे पुढचे बोलायची सवय नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी (दि. २) लगाविला.
सांगलीच्या विजयनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजपचे शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादीत येत आहेत. राज्यातील आणखी काही नेते संपर्कात आहेत का, असे विचारता पाटील म्हणाले की, भाजपसारखे पुढचे बोलण्याची आम्हाला सवय नाही. जशा घडामोडी घडतील, तशी नक्की माहिती देऊ, असे सांगत भाजप नेत्यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिले.
यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राहुल पवार, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, शंभोराज काटकर, माजी महापौर सुरेश पाटील, शेखर माने, नगरसेवक विष्णू माने, वहिदा नायकवडी, मालन हुलवान, शुभांगी साळुंखे, स्वाती पारधी, माजी नगराध्यक्ष चिमण डांगे उपस्थित होते.
पडळकरांना चिमटा
माणसाने राजकारण, समाजकारण, धर्मकारण कुठे करायचे, याचे शहाणपण शिकले पाहिजे, असा चिमटा माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता काढला. स्मारक उद्घाटनावरून भाजप व राष्ट्रवादीत संघर्ष निर्माण झाला होता.