..त्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव, माझ्यावर खापर फोडण्याची गरज नाही; मानसिंगराव नाईक यांचे प्रत्युत्तर
By अशोक डोंबाळे | Published: July 16, 2024 07:04 PM2024-07-16T19:04:30+5:302024-07-16T19:05:36+5:30
त्यांना पडलेली १२ मते शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचीच
सांगली : भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा पराभव त्यांना मतांचे गणित जुळवताना न आल्यामुळे झाला आहे. परंतु, त्यांच्या या अपयशाचे खापर त्यांनी माझ्यावर फोडण्याची गरज नाही, असे सडेतोड उत्तर सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष व शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंगळवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिले.
शेकापचे जयंत पाटील यांनी 'आमदार मानसिंगराव नाईक यांचं मत फुटलं' असा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना मानसिंगराव नाईक बोलत होते. नाईक म्हणाले, जयंत पाटील यांचे स्वत:चे एकही मत नाही. तरीही ते विधान परिषदेच्या निवडणूकीत उतरले. त्यांनी मताचे गणित जुळवायला पाहिजे होते.
त्यांनी एमआयएम पक्षासह अन्य छोट्या पक्षांची मते मिळणार असे सांगितले होते. परंतु, त्यांना त्यापैकी एकही मत मिळाले नाही. काँग्रेसकडूनही उध्दवसेनेला मदत झाली. म्हणूनच जयंत पाटील यांचा पराभव झाला. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची १२ मतेच त्यांना मिळाली असून उर्वरित एकही मत त्यांना मिळाले नाही. असे असतांना त्यांनी माझ्यावर त्यांच्या पराभवाचे खापर फोडणे योग्य वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील यांच्याकडूनही विचारणा
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शेकापचे जयंत पाटील यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून ''आमच्या आमदारांवर मत फुटल्याचे आरोप कशाच्या आधारावर केला आहे?'' अशी विचारणा केली आहे. यावर त्यांनी काही स्पष्टीकरण दिले नाही. सध्या त्यांची चूक लक्षात आल्यावर दुसरेच नाव घेत आहेत, असेही मानसिंगराव नाईक म्हणाले.
लोकसभा निवडणुकीचाही फटका
रायगड लोकसभा निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांनी मदत केली नाही, म्हणून उद्धवसेना नाराज होती. म्हणूनच उद्धवसेनेकडून उमेदवार उभा केला. या उमेदवारास काँग्रेसकडून मदत झाली, म्हणून ते विजय झाले आणि जयंत पाटील पराभूत झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे, असेही मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.