'गुप्तधन किंवा पैशांचा पाऊस पडत नसतो', सांगलीतील घटनेनंतर डॉ. दाभोलकरांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 06:35 PM2022-06-29T18:35:08+5:302022-06-29T18:36:09+5:30
सांगली पोलिसांनी या संवेदनशील प्रकरणाचा योग्य दिशेने तपास केल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन
सांगली - जिल्ह्यातील म्हैसाळ येथे वनमोरे कुटुंबीयांचे मांत्रिक अब्बास बागवान व त्याचा सहकारी धीरज सुरवसेकडून झालेले हत्याकांड अत्यंत निंदनीय, अमानुष आहे. या हत्याकांडाचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने निषेध करण्यात आला. तसेच, वनमोरे कुटुंबीयांना आदरांजली व्यक्त करत गुप्तधन, पैशांचा पाऊस अशी आमिषे दाखवून लुबाडणार्यांवर विश्वास न ठेवता, पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहनही त्यांच्याकडून नागरिकांना करण्यात आले.
सांगलीपोलिसांनी या संवेदनशील प्रकरणाचा योग्य दिशेने तपास केल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांचा झालेला मृत्यू ही आत्महत्या नसून खून असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. गुप्तधन शोधण्याच्या प्रकरणात हे खून झाल्याचे प्राथमिक तपासात समजते. अघोरी अंधश्रद्धेच्या प्रकारातून ही घटना घडल्याचे पुढे येत असल्याने या प्रकरणातील अटक केलेल्या मांत्रिकांना जादूटोणाविरोधी कायदा लावावा, अशी मागणी ‘महाराष्ट्र अंनिस’मार्फत राज्य कार्यकारी समिती सदस्य हमीद दाभोळकर यांनी केली. गुप्तधन, पैशांचा पाऊस अशी आमिषे दाखवून लुबाडणार्या जिल्ह्यातील मांत्रिकांच्या टोळ्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणीही दाभोलकर, राहुल थोरात आणि फारुख गवंडी यांनी पत्रकार परिषदेत केली.
सांगलीतील डॉ. माणिक आणि पोपट वनमोरे बंधू हे गेली अनेक महिने मुख्य संशयित मांत्रिक बागवान आणि सहकारी धीरज सुरवसे यांच्या संपर्कात होते, हे आता स्पष्ट झाले आहे. मांत्रिकांनी वनमोरे बंधूंना गुप्तधन शोधण्यासाठी मदत करण्याचे कारण दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे देखील समोर आले आहे. जादूटोणाविरोधी कायद्यानुसार दैवी शक्तीचा दावा करून लोकांना फसवणे आणि ठकवणे हा गुन्हा असल्याने तातडीने या प्रकरणी जादूटोणाविरोधी कायदा लावावा. जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत असलेली ‘दक्षता अधिकारी’ ही तरतूद प्रभावी पद्धतीने कार्यान्वित करण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित होत आहे. कायद्यामधील या तरतुदीनुसार प्रत्येक पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी हे दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत असतात. संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बाबा-बुवांच्या ठिकाणी जाऊन चौकशी करणे आणि गरज पडल्यास साहित्य जप्त करण्याचे देखील त्यांना अधिकार आहेत.
दरम्यान, वनमोरे बंधू हे अनेक दिवस गुप्तधनाचा शोध घेत असल्याचे आजूबाजूच्या अनेक लोकांना माहीत होते. त्यासाठी त्यांनी अनेक खासगी सावकारांकडून पैसे कर्ज घेतले होते. यासारख्या प्रकरणांविषयी जागरूक नागरिकांनी वेळीच तक्रार केली असती आणि दक्षता अधिकार्यांनी त्यांची दाखल घेतली असती तर अशा घटना टाळता येऊ शकतात, असेही दाभोलकर यांनी म्हटले.