लोकसभेसाठी सांगलीत बहुरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:57 PM2019-04-08T23:57:41+5:302019-04-08T23:57:48+5:30
सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी सांगली मतदारसंघातून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी आठ उमेदवारांनी माघार घेतली. आता निवडणूक रिंगणात ...
सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी सांगली मतदारसंघातून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी आठ उमेदवारांनी माघार घेतली. आता निवडणूक रिंगणात १२ उमेदवार राहिले आहेत. भाजपचे संजयकाका पाटील, ‘स्वाभिमानी’चे विशाल पाटील आणि बहुजन वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर या प्रमुख उमेदवारांसह अन्य पक्ष व अपक्षांमध्ये लढत होणार आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रियेसह चिन्हांचेही वाटप झाल्याने आता आज, मंगळवारपासून खऱ्याअर्थाने प्रचाराची रंगत वाढणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचीप्रक्रिया २८ मार्चपासून सुरू झाली होती. छाननीत एका उमेदवाराचा अर्ज अवैध, तर उर्वरित २० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. सोमवारी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानुसार आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता बारा उमेदवार नशीब अजमावणार आहेत.
अजितराव पाटील, राजेंद्रप्रसाद जगदाळे, अंकुश घुले, ऋषिकेश साळुंखे, नानासाहेब बंडगर, अशोक माने, अल्लाउद्दीन काझी आणि सचिन वाघमारे या आठ जणांनी उमेदवारी मागे घेतली. भाजप व स्वाभिमानी शेतकरी पक्ष या राजकीय पक्षांना त्यांची निवडणूक चिन्हे, तर इतरांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चिन्हे देण्यात आली आहेत.
चौकट
मतदान यंत्रावर असा असेल उमेदवारांचा क्रम
१. शंकर दादा माने (बहुजन समाज पार्टी)
२. संजयकाका रामचंद्र पाटील (भाजप)
३. आनंद शंकर नालगे-पाटील (बळीराजा पार्टी)
४. गोपीचंद पडळकर (बहुजन वंचित आघाडी)
५. डॉ. राजेंद्र नामदेव कवठेकर (बहुजन मुक्ती पार्टी)
६. विशाल प्रकाशराव पाटील (स्वाभिमानी शेतकरी पक्ष)
७. अभिजित वामनराव आवाडे-बिचुकले (अपक्ष)
८. अधिकराव संपत चन्ने (अपक्ष)
९. दत्तात्रय पंडित पाटील (अपक्ष)
१०. नारायण चंदर मुळीक (अपक्ष)
११. भक्तराज रघुनाथ ठिगळे (अपक्ष)
१२. हिंमत पांडुरंग कोळी (अपक्ष)