कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याच्या तक्रारी ; मालेवाडी पाणी पुरवठ्यात भ्रष्टाचार होऊनही कारवाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 11:35 PM2020-02-05T23:35:21+5:302020-02-05T23:42:46+5:30
१९८६ मध्ये जयंत पाटील यांनी वारणा—कृष्णा खोऱ्यातील इंच न् इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी पदयात्रा काढली होती. यानंतर नदीकाठ व परिसरात मोठ्या प्रमाणात जलसिंचन योजनेचे जाळे निर्माण झाले. ही योजना सुरळीत सुरु राहावी यासाठी संस्थांची निर्मिती झाली.
अशोक पाटील ।
इस्लामपूर : मालेवाडी (ता. वाळवा) येथील राजारामबापू पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्थेत एक कोटीहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल शासकीय लेखापरीक्षक आर. बी. पाटील यांनी दिला आहे. तो येथील उपनिबंधक कार्यालयाला मिळून महिन्याहून अधिकचा काळ लोटला, तरीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. संचालक मंडळ बरखास्त करावे, त्यांच्याकडून पैशाची वसुली करुन प्रशासक नेमावा, अशी मागणी शंकर महादेव जाधव, किरण प्रकाश माने, मंगेश भीमराव कोळेकर यांच्यासह सभासदांनी केली आहे.
१९८६ मध्ये जयंत पाटील यांनी वारणा—कृष्णा खोऱ्यातील इंच न् इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी पदयात्रा काढली होती. यानंतर नदीकाठ व परिसरात मोठ्या प्रमाणात जलसिंचन योजनेचे जाळे निर्माण झाले. ही योजना सुरळीत सुरु राहावी यासाठी संस्थांची निर्मिती झाली. मालेवाडी येथे १९९२ मध्ये राजारामबापू पाणी पुरवठा संस्थेची स्थापना झाली. या संस्थेसाठी राजारामबापू कारखाना आणि स्टेट बँकेने अर्थसाहाय्य केले होते. अल्पावधीतच म्हणजे १९९९ मध्ये संस्था कर्जमुक्त झाली.
मात्र २८ नोव्हेंबर २0१७ रोजी सभासद शंकर महादेव जाधव यांनी ८३ हजार ११९ रुपये शुल्क भरून संस्थेचे फेरलेखापरीक्षण करण्याची मागणी केली. लेखापरीक्षक आर. बी. पाटील यांनी फेरलेखापरीक्षण करून २९ सप्टेंबर २0१९ रोजी एक कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल दिला.
त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी, ही रक्कम संचालक मंडळाकडून वसूल करावी, असा आदेश उपनिबंधक इस्लामपूर यांना दिला. परंतु सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही संबंधित भ्रष्टाचारी संचालक मंडळावर कसलीही कारवाई झालेली नाही. प्रशासनाने लवकरात लवकर दोषी संचालक मंडळावर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन, उपोषणाचा मार्ग अवलंबणार असल्याचा इशारा संजय पाटील, सुरेश घोरपडे, धनाजी माने, अजित माने यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे. यातून तरी प्रशासन जागे होणार का?
संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली असून या संस्थेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. दोष दुरुस्ती अहवाल देण्यास अजून मुदत आहे. संस्थेचे दोन ते तीन समित्यांकडून लेखापरीक्षण करण्यात येते. संस्थेचे लेखापरीक्षण करण्यात आले होते. त्यानंतर आमच्याकडून अहवाल मागवण्यात आला होता. तो देण्यास विलंब झाल्यामुळे प्राप्त परिस्थितीनुसार केलेला लेखापरीक्षण अहवाल पुढे दिला. दोष दुरुस्तीचा कालावधी अजून संपलेला नसून या संस्थेत भ्रष्टाचार झाला, असे कसे म्हणता येईल?
- रणजित हंबीरराव खवरे, अध्यक्ष, राजारामबापू पाणीपुरवठा संस्था, मालेवाडी.