एकाही खात्याची कर्जमाफी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:57 PM2017-10-18T23:57:28+5:302017-10-18T23:57:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्याप्रमाणेच सांगली जिल्ह्यातील काही शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीच्या रकमा दिवाळीच्या पहिल्यादिवशी जमा होतील, अशी अपेक्षा होती. यादीच निश्चित नसल्याने या अपेक्षेवर पाणी पडले. एकाही खात्यावर रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यामुळे प्रमाणपत्र देऊन शेतकºयांची बोळवण करण्याची वेळ प्रशासनावर आली.
सांगली जिल्ह्यात एकूण १ लाख ८६ हजार शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. वैयक्तिक अर्जांची छाननी प्रक्रिया अजून सुरू आहे. आचारसंहितेमुळे २५४ गावांमधील कर्जमाफीसंदर्भातील प्रक्रिया यापूर्वीच रेंगाळली आहे. उर्वरित गावांमध्येही चावडीवाचन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे एकूणच प्रक्रियेतील गोंधळ दिसून येत आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची घोषणा केली. त्यामुळे शेतकºयांना अपेक्षा वाटत होती, मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीची रक्कम खात्यावर टाकण्यापूर्वीची कोणतीही पूर्वतयारी जिल्ह्यात झालेली नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील एकाही शेतकºयाला मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा लाभ मिळू शकला नाही.
सांगली जिल्ह्यात प्राप्त अर्जांपैकी १ लाख ७१ हजार कर्जदारांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा बॅँकेला, तर ५१ हजार कर्जदारांची माहिती देण्याचे आदेश अन्य बॅँकांना दिले आहेत. छाननीमध्ये यातील अनेकजण एकाच कुटुंबातील असल्यामुळे ही संख्या आणखी कमी होईल. २ लाख ३० हजार कर्जदारांची माहिती पाठविली आहे. पात्र-अपात्रतेबाबतची प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे.