सांगलीतील गव्याचा अखेर शोध नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:30 AM2021-03-09T04:30:20+5:302021-03-09T04:30:20+5:30
सांगली : शहरातील गव्हर्नमेंट कॉलनी परिसरातील गजराज कॉलनीमध्ये आढळलेल्या गव्याचा शोध लागलाच नाही. रात्रीपासून वन विभागाचे कर्मचारी शोधासाठी परिसरात ...
सांगली : शहरातील गव्हर्नमेंट कॉलनी परिसरातील गजराज कॉलनीमध्ये आढळलेल्या गव्याचा शोध लागलाच नाही. रात्रीपासून वन विभागाचे कर्मचारी शोधासाठी परिसरात थांबून होते. मात्र, त्याचा कुठेही शोध लागला नाही. त्यामुळे आलेल्या मार्गानेच तो परत गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रविवारी रात्री नऊच्या सुमारास गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये असलेल्या गणपती मंदिराजवळ गवा दिसून आला होता. परिसरातील नागरिकांनी तो गवाच असल्याची खात्री झाल्यानंतर तात्काळ नगरसेवकांसह इतरांना माहिती दिली होती. वन विभागाचेही पथकही तात्काळ दाखल झाले होते. मात्र, वृंदावन व्हिला परिसरमार्गे तो कुंभार मळा परिसरातून गवा अंधारात गायब झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
रात्रीच वन विभागाच्या पथकाने गवा सुरक्षितपणे निसर्ग सानिध्यात जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
या भागातील सर्व परिसर कर्मचाऱ्यांनी पिंजून काढला. मात्र, तो अखेर आढळलाच नाही.
चौकट
वन विभागाचे विभागीय वन अधिकारी सुहास धाणके यांनी सांगितले की, रात्री संपूर्ण परिसरात पाहणी करण्यात आली. मात्र, गवा आढळून आला नाही. तो परतला असल्याची शक्यता आहे. तो पुन्हा असा नागरी भागात येणार नाही, यासाठी उपाययोजना करण्यात येतील. तरीही गवा दिसून आल्यास नागरिकांनी त्यास काही न करता वन विभागाशी संपर्क साधावा. या भागात गस्ती पथक तैनात करण्यात येणार आहे.