‘कृष्णा’कडे लाकूड खरेदीसही पैसे नाहीत

By admin | Published: July 6, 2015 12:37 AM2015-07-06T00:37:22+5:302015-07-06T00:53:17+5:30

सुरेश भोसले यांची खंत : कारखान्यावर ५०६ कोटी रुपयांचे कर्ज

There is no money to buy wood from Krishna | ‘कृष्णा’कडे लाकूड खरेदीसही पैसे नाहीत

‘कृष्णा’कडे लाकूड खरेदीसही पैसे नाहीत

Next

शिरटे : गत संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळे आज ‘कृष्णा’वर पाचशे कोटी रुपयांचे कर्ज आहे. जास्तीची कामगार भरती व अनावश्यक खर्चामुळे कृष्णाकडे लाकूड खरेदीसाठीही पैसे उपलब्ध नसल्याचे नूतन अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी स्पष्ट केले. याचवेळी त्यांनी जयवंतराव भोसले यांचा सुवर्णकाळ पुन्हा निर्माण करण्यासाठी जे जे योगदान देतील, त्यांना सोबत घेणार असल्याचेही स्पष्ट केले.
रेठरेबुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सह. साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी झाल्यानंतर झालेल्या आभार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कऱ्हाड तालुका साखर कामगार युनियनतर्फे एम. के. कापूरकर, सर्जेराव पाटील यांच्याहस्ते नूतन अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कृष्णात राजकारण आल्यामुळे २० वर्षे तो मागे गेला आहे. ३९३ कोटी देय कर्ज व ११३ कोटींची देय बिले असे ५०६ कोटींचे कर्ज कृष्णावर आहे. पर्यावरण मंडळाचे नियम न पाळल्यामुळे कारखाना आज बंद अवस्थेत आहे. साखर दुकान, डिझेल व पेट्रोल पंपावरती आर्थिक ताळेबंद लागत नाही. आर्थिक अडचणीमुळे कारखान्याकडे आता लाकूड खरेदीसाठीही पैसे नाहीत. आज कृष्णा कारखान्यात ३२६६ कामगार आहेत. यातील १५०० कामगार कंत्राटी आहेत. अनावश्यक भरती केल्यामुळे कारखान्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. सहकारातील आदर्शवत कारखान्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी जे जे सहकार्य करतील, त्यांना आम्ही सोबत घेऊ. कारखान्याचे अहवाल सामान्य शेतकऱ्यांना समजत नाहीत. ते यापुढे सोप्या भाषेत मांडून देण्याची व्यवस्था उपलब्ध करू, असे भोसले यांनी स्पष्ट केले.कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले म्हणाले, सहकारात आदर्शवत असणारा कृष्णा हा एक विचार होता, परंतु सर्वात जास्त कर्जबाजारी म्हणून कृष्णाची ओळख आज महाराष्ट्रात आहे. कृष्णा कर्जबाजारी होऊन डबघाईस कसा आला, याचा जाब विचारण्यासाठी सभासदांनी माजी अध्यक्षांना निवडून दिले आहे.
एल. एम. पाटील, माजी जि. प. सदस्य प्रकाश पाटील, शिवाजीराव जाधव, माजी सभापती बाळासाहेब लाड, प्र. कार्यकारी संचालक अशोक नलवडे यांनीही मनोगत व्यक्त केले. उदय मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. हेमंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आनंदराव मोहिते यांनी आभार मानले.यावेळी कृष्णा बँकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे, जि. प. सदस्य रणजित पाटील, जगदीश पाटील, माणिकराव पाटील, प्रदीप थोरात, अ‍ॅड. संग्राम पाटील, जालिंदर पाटील, संपतराव पाटील, प्रा. संजय पाटील, दिलीपराव देसाई, एल. आर. पाटील, प्रकाश देसाई, प्रमोद पाटील, ब्रह्मानंद पाटील, उपस्थित होते. (वार्ताहर)

\
मोफत साखर देणारच..!‘कृष्णा’ आज प्रचंड आर्थिक संकटात आहे. तरीही यातून मार्ग काढून येणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होऊन होणाऱ्या वार्षिक सभेत सभासदांच्या पाठिंब्यावर सभासदांना मोफत साखर देणारच, असे कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

मातीमुळेच ‘कृष्णा’ची माती..!
माजी अध्यक्षांनी कारखान्यात अधिक वेळ न देता मातीसारख्या कार्यक्रमालाच अधिक वेळ दिला. बाह्यशक्तीच्या ऐकण्यामुळे कारखान्याची आज माती झाल्याचे सांगली जि. प. चे माजी सभापती बाळासाहेब लाड यांनी म्हणताच सभास्थळी एकच हशा पिकला.

Web Title: There is no money to buy wood from Krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.