‘वसंतदादा’च्या जागेसाठी नव्याने एकही निविदा नाही
By admin | Published: November 5, 2014 10:20 PM2014-11-05T22:20:50+5:302014-11-05T23:39:02+5:30
अल्प प्रतिसाद : आतापर्यंत केवळ तीन निविदा : समितीकडून २० नोव्हेंबरपर्यंत निविदा प्रक्रियेला मुदतवाढ
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २१ एकर जागा विक्रीसाठी निविदा दाखल करण्यास मुदतवाढ देऊनही नव्याने एकही निविदा दाखल झालेले नाही. आतापर्यंत १०३ प्लॉटपैकी केवळ तीन प्लॉटसाठी निविदा दाखल झाल्या आहेत. त्यामुळे जागा विक्रीसाठी नियुक्त केलेल्या समितीने निविदा प्रक्रियेला २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला आहे. बँका व शेतकऱ्यांची थकित देणी देण्यासाठी कारखान्याची २१ एकर जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. कारखान्याच्या उत्तर बाजूला सांगली-माधवनगर रस्त्यालगतच ही जागा आहे. त्यामुळे या जागेला चांगली किंमत मिळून कारखान्याची देणी भागतील, असा तर्कही काढण्यात आला होता. कारखान्याच्या २१ एकर जागा विक्रीला शासनानेही परवानगी दिली. जागा विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चारजणांनी समितीही नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष अवर निबंधक सह. संस्था तथा जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे असून, समितीत पुणे साखर आयुक्त (प्रशासन) संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व कोल्हापूर प्रादेशिक सह. संस्था साखर योगीराज सुर्वे यांचा समावेश करण्यात आला आहे.
कारखान्याने २१ एकर जागेत १०३ प्लॉट पाडले. त्याच्या रेखांकनाला महापालिकेची मान्यताही घेण्यात आली आहे. त्यानंतर समितीने जागा विक्रीची निविदा प्रसिद्ध करीत १५ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. या कालावधित केवळ तीन प्लॉटसाठी तीन निविदा दाखल झाल्या. निविदेला अल्प प्रतिसाद मिळाल्याने समितीने प्रक्रियेला ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. या मुदतीत नव्याने एकही निविदा दाखल झाली नाही. त्यामुळे समितीने पुन्हा एकदा २० नोव्हेंबरपर्यंत निविदा दाखल करण्यास मुदतवाढ दिली आहे. (प्रतिनिधी)