माणूस जोडण्याइतकी दुसरी श्रीमंती नाही
By admin | Published: June 27, 2016 11:38 PM2016-06-27T23:38:28+5:302016-06-28T00:37:17+5:30
तारा भवाळकर : वाळव्यात क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी स्मृतिदिनी अभिवादन
वाळवा : आपल्याला संपत्तीचा वारसा पुढे न्यायचा नसतो, तर गुणांचा वारसा पुढे न्यायचा असतो. माणूस जोडण्याइतकी मोठी श्रीमंती जगात दुसरी कुठलीही नाही, असे प्रतिपादन लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. तारा भवाळकर यांनी सोमवारी केले.
हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा यांच्यावतीने आयोजित क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी (आईसाहेब) यांच्या २७ व्या स्मृतिदिन समारंभ सभेत त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संकुलाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी होते. कारखान्याचे माजी अध्यक्ष महादेव कांबळे, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, हुतात्मा दूध संघाचे उपाध्यक्ष भगवान पाटील, जयवंत अहिर, कारखान्याचे कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस प्रमुख उपस्थित होते.
डॉ. भवाळकर म्हणाल्या की, ग्रामीण भागातील क्रांतिकारकांची जी नोंद इतिहासात व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. त्याचा एक सलग इतिहास आपल्या महाराष्ट्राला आवश्यक आहे. सध्या इतिहासाची मोठी उलथापालथ होत आहे. मात्र ग्रामीण क्रांतिकारकांच्या नोंदींचा सलग एक इतिहास व्हायला पाहिजे. क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा आणि क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी (आईसाहेब) यांचा इतिहास समाजासमोर आला पाहिजे.
प्रा. डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, मोठ्या माणसांची स्मारके ही लोकांच्या हृदयात उभी करायची असतात. ती दगड-धोंड्यात उभी करायची नसतात. मुलींनी बुद्धिमान, चारित्र्यसंपन्न असले पाहिजे. क्रांतिमाता लक्ष्मीबाई (आईसाहेब) यांच्यासारखे निर्भय असले पाहिजे. न शिकलेली माणसेही अनुभवाने समृद्ध असतात. जगातली कुठलीही शक्ती माझ्यावर अन्याय करू लागली, तर मी त्याविरुद्ध लढेन, ही क्रांतिकारी शक्ती आजच्या मुलींमध्ये असली पाहिजे.
वैभव नायकवडी म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांनी कारावासही भोगला. पण स्वातंत्र्यानंतर त्या स्वातंत्र्यसैनिक म्हणून कुठेही मिरवत बसल्या नाहीत. आपल्याला इतिहास माहिती नसेल, तर आपण वर्तमानात काय करणार व भविष्य तरी काय घडविणार? हा मोठा प्रश्न आहे.
लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. एस. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. राजा माळी यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके यांनी आभार मानले.
कार्यक्रमास सरपंच गौरव नायकवडी, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, बझारच्या कार्यवाह नंदिनी नायकवडी, हुतात्मा बॅँकेचे अध्यक्ष किरणदादा नायकवडी, बी. आर. थोरात, यशवंत बाबर, सावकर कदम, नंदू पाटील, विशाखा कदम, व्ही. डी. वाजे, पोपट फाटक, दीपक पाटील, जयकर चव्हाण, सुरेश होरे, मुख्याध्यापक एस. पी. होरे, प्रा. मधुकर वायदंडे, अनिल शेजाळे उपस्थित होते. (वार्ताहर)