साहित्याशिवाय जीवनात समाधान नाही
By admin | Published: December 29, 2015 11:44 PM2015-12-29T23:44:32+5:302015-12-30T00:29:05+5:30
जयंत पाटील : शिराळ्यात कुमार युवा साहित्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
शिराळा : जीवन यशस्वी होण्यासाठी जीवनात साहित्याची जोड असायला हवी. साहित्याशिवाय जीवनात समाधान लाभत नाही, असे प्रतिपादन माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील यांनी केले.
येथील न्यू इंग्लिश स्कूल शिराळा येथे लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्ट साहित्य परिषद, मराठी अध्यापक संघाच्यावतीने आयोजित कुमार युवा मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी होते.
आमदार पाटील म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना साहित्याची रुची असायला हवी. साहित्य आयुष्यात विरंगुळा देते. परंतु आजचा तरुण वाचन संस्कृतीपासून दूर जाऊ लागला आहे. बारावीनंतरच्या मुलांमध्ये वाचनाची सवय कमी होत चालली आहे. पाठ्यपुस्तकाशिवाय अवांतर वाचन तरुणांनी केले पाहिजे, त्यांच्या मनाचा विकास त्याशिवाय होणार नाही.
विराज नाईक म्हणाले की, २१ व्या शतकातील तरुणांमध्ये मन व बुद्धी सक्षम होण्यासाठी साहित्याची गरज आहे. कुमार साहित्य संमेलनामुळे ग्रामीण भागात साहित्य चळवळ रुजू लागली आहे.
संस्थेचे अध्यक्ष एस. व्ही. हसबनीस म्हणाले की, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी साहित्य संमेलनाची गरज आहे. या संमेलनातून विद्यार्थ्यांना निश्चितच साहित्यविषयक सकारात्मक दृष्टिकोन मिळेल.
यावेळी शिक्षणाधिकारी एम. आर. यादव यांचा आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास लेखिका इंदुमती जोंधळे, गटशिक्षणाधिकारी सुनील मंद्रुपकर, विश्वप्रतापसिंग नाईक, डी. आर. महाजन, सुमन महाजन, जयवंतराव देशमुख, सौ. सुनीता नाईक, प्रा. वैजनाथ महाजन, मुख्याध्यापक एस. एस. भोसले, सरपंच गजानन सोनटक्के, भीमराव गायकवाड, विजयराव नलवडे उपस्थित होते. एस. एम. पाटील यांनी स्वागत केले. ज्योती जोशी यांनी आभार मानले. (वार्ताहर)
विविध उपक्रम : ग्रंथदिंडीने उद्घाटन
कुमार युवा मराठी साहित्य संमेलनानिमित्त दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शहरातून आमदार जयंत पाटील व मानसिंगराव नाईक यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. सोमवार पेठ, गुरुवार पेठमार्गे विष्णुपंत नगरीत ही ग्रंथदिंडी नेण्यात आली. ग्रंथदिंडीचे उद्घाटन शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील मंद्रुपकर यांच्याहस्ते करण्यात आले. एस. एम. पाटील, आर. बी. शिंदे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांना चौकस, परिपूर्ण बनविण्यासाठी संमेलने उपयुक्त : मानसिंगराव नाईक
मानसिंगराव नाईक म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टमार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील विद्यार्थी कला, क्रीडा, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ लागले आहेत. ते चौकस, परिपूर्ण व्हावेत, यासाठी साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे.