ऊसदराची कोंडी फुटल्याशिवाय ऊसतोड नाही, रविवारी गाव बंद; नांद्रेतील बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:43 AM2017-11-04T11:43:51+5:302017-11-04T11:56:06+5:30
सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दराची कोंडी फोडल्याशिवाय ऊसतोडी घ्यायच्या नाहीत, असा निर्णय नांद्रे (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच सर्वच शेतकरी संघटनांच्या ऊस दर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय गाव बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला.
सांगली ,दि. ०४ : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दराची कोंडी फोडल्याशिवाय ऊसतोडी घ्यायच्या नाहीत, असा निर्णय नांद्रे (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच सर्वच शेतकरी संघटनांच्या ऊस दर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय गाव बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला.
नांद्रे येथे शेतकऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील, रावसाहेब ऐतवडे, सुभाष पाटील, मनोज पाटील, रावसाहेब पाटील उपस्थित होते.
या बैठकीत शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात तीव्र शब्दात मते व्यक्त केली. शेतीचा उत्पादन खर्च वाढला असतानाही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेत नाही. साखर कारखानदारांना पोषक अशीच धोरणे राबवून शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. जोपर्यंत सरकार आणि साखर कारखानदार ऊस दराची कोंडी फोडणार नाहीत, तोपर्यंत ऊसतोडी न घेण्याचा निर्णय सर्व शेतकऱ्यांनी घेतला.
सर्व संघटनांनी ऊस दरासाठी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवार दि. ५ नोव्हेंबर रोजी नांद्रे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच रविवारी नांद्रेसह परिसरातील गावांमध्ये मोटारसायकल रॅली काढून शेतकऱ्यांमध्ये ऊस दराबाबत जनजागृती करण्याचा निर्णयही बैठकीमध्ये शुक्रवारी घेण्यात आला.
नांद्रे येथील शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनांचेही प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी, संघटनांचे वाद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र येऊन आंदोलनाचा लढा पुकारण्याची विनंती केली. जो शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेईल, त्यांना शेतकऱ्यांचे यापुढे सहकार्य मिळणार नाही, अशा भावना शेतकऱ्यांनी भाषणात व्यक्त केल्या.