सलग चार दिवस जिल्ह्याला लसीचा पुरवठा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:43 AM2021-05-05T04:43:02+5:302021-05-05T04:43:02+5:30
सांगली : जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशी कोरोना लसीचा पुरवठा होऊ शकला नाही. सोमवारी दिवसभरात फक्त १,२३६ जणांचे लसीकरण होऊ ...
सांगली : जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशी कोरोना लसीचा पुरवठा होऊ शकला नाही. सोमवारी दिवसभरात फक्त १,२३६ जणांचे लसीकरण होऊ शकले. त्यामध्ये १८ ते ४५ वयोगटांच्या ९४४ लाभार्थींचा समावेश आहे.
लस मिळत नसल्याने नागरीक खासगी रुग्णालयांकडे विकतची लस घेण्यासाठी जात आहेत, पण तेथेही साठा संपल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी २० हजार डोस मिळाले होते, ते शनिवारीच संपले. त्यानंतर, अद्याप लस मिळालेला नाही. आरोग्य यंत्रणेने दोन लाख डोस मागितले आहेत, पण पुरवठा होत नसल्याने लसीकरणात खंड पडला आहे. प्रशासन दररोजच पुण्यात पुरवठा यंत्रणेशी संपर्क साधत आहे. लस नेण्याविषयी मंगळवारी निरोप मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर, बुधवारी कदाचित पुरवठा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा दररोजचा आकडा वाढता आहे. या स्थितीत लस घेऊन स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे, पण लस नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. पैसे देऊनही लस मिळत नसल्याने अस्वस्थता आहे. १८ ते ४५ वयोगटांसाठी साडेसात हजार मात्रा आल्या आहेत. पुरवठा अत्यल्प असल्याने फक्त पाचच केंद्रांवर लसीकरणाची सोय केली आहे. तेथेही गुरुवारपर्यंत (दि.६) नोंदणी पूर्ण झाली आहे.
चौकट
साडेपाच लाखांचा टप्पा पार
सोमवारी १८ ते ४५ वयोगटांतील ९४४ तरुणांना लस मिळाली. ४५ ते ६० वयोगटांतील ५० जणांना तर ६० पेक्षा अधिक वयाच्या फक्त सात ज्येष्ठांना लस मिळू शकली. दुसऱ्या डोससह १,२३६ जणांचे लसीकरण दिवसभरात झाले. आजअखेर ५ लाख ६५ हजार १५८ जणांचे लसीकरण झाले आहे.