शहरात ट्रेसिंगचा पत्ता नाहीच, कोरोनाबाधित बिनधास्त रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:28 AM2021-05-20T04:28:51+5:302021-05-20T04:28:51+5:30
जिल्ह्यात सर्वाधिक बाधितांची आणि कोरोना मृत्यूंची संख्या महापालिका क्षेत्रात आहे. दररोज दीडशेहून अधिक रुग्णांची भर पडत असताना बाधित वाढू ...
जिल्ह्यात सर्वाधिक बाधितांची आणि कोरोना मृत्यूंची संख्या महापालिका क्षेत्रात आहे. दररोज दीडशेहून अधिक रुग्णांची भर पडत असताना बाधित वाढू नयेत यासाठी यंत्रणा काम करताना कमी पडत आहे. गेल्या वर्षी कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचार घेणारा रुग्ण स्वत: कुटुंबापासून लांब राहत होता. यावर्षी मात्र खासगीतच नमुन्यांची तपासणी करून घेत लक्षणे नसतील तर घरातच थांबत आहेत. केवळ थांबत नाहीत तर सकाळी, संध्याकाळी कुटुंबासमवेत त्यांचा बाहेर फेरफटकाही असतो, तर अनेक रुग्ण स्वत:च आपली औषधे आणण्यासाठी, इतर खरेदीसाठीही बाहेर पडत आहेत.
पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्या रुग्णांची नोंद घेऊन त्याच्या संपर्कातील किमान २० लोकांची यादी बनविण्याचे ट्रेसिंगचे काम तर फारच कमी होत आहे. अपेक्षित संख्येच्या ५० टक्केही ट्रेसिंग होत नसल्याने बाधितांचे प्रमाण वाढतच चालले आहे.
सध्या शहरातील विविध लॅबमध्ये कोरोना चाचणी केली जाते. तपासणी झाल्यानंतर त्याची माहिती आरोग्य विभागाला देणे अपेक्षित असते. मात्र, तिथून पूर्ण माहिती पाठविण्यात येत नसल्यानेही अनेक उपनगरांत कोरोनाबाधित घरात आणि आरोग्य यंत्रणा मात्र कुठेच नाही असे चित्र आहे.
गेल्यावर्षी एखाद्या उपनगरात कोरोनाबाधित आढळल्यानंतर तो संपूर्ण भाग निर्जंतुकीकरण करण्यात येत असे. यावर्षी अपवाद वगळता ही यंत्रणा प्रभावीपणे काम करत नसल्याने निर्बंध कितीही कडक केले तरीही बाधितच सुपर स्प्रेडरची धोकादायक भूमिका बजावत आहेत.
चौकट
दृष्टिक्षेपात आकडेवारी
महापालिका क्षेत्रातील एकूण बाधित २५८९८
एकूण मृत्यू ८२७ (सांगली ४५८, मिरज ३१३, कुपवाड ५६)
महापालिका क्षेत्रातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १७००
होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणारे १३००