‘त्यांना’ संस्था उभी करायचीही अक्कल नाही! : धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 11:45 PM2018-04-05T23:45:44+5:302018-04-05T23:45:44+5:30
इस्लामपूर : या भागातला एक राज्यमंत्री, कुणाच्या जिवावर कुणाशी खेटतो आहे. एक संस्था उभी करण्याची अक्कल नाही आणि निघालेत लढायला.
इस्लामपूर : या भागातला एक राज्यमंत्री, कुणाच्या जिवावर कुणाशी खेटतो आहे. एक संस्था उभी करण्याची अक्कल नाही आणि निघालेत लढायला. गोतावळ्यातच कृषी अवजारांचा घोटाळा करणाऱ्यांनी जयंतरावांच्या नादाला लागू नये, असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा नामोल्लेख टाळून राष्ट्र वादीचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.
येथील नगरपालिकेच्या जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात कार्यकर्ते आणि जनतेच्या गर्दीने खचाखच भरलेल्या जनसमुदायाच्या साक्षीने केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसने सुरू केलेल्या हल्लाबोल यात्रेतील ६३ वी सभा झाली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, राज्य बॅँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुंडे म्हणाले, शुक्रवारी भाजपचा स्थापना दिवस आहे. मुंबईतील मेळाव्याच्या पूर्वसंध्येला इस्लामपुरात होणारी हल्लाबोलची ही विक्रमी सभा राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार उलथवून टाकणारी ठरेल. राज्यातील जनता या फसव्या सरकारला कंटाळली आहे. अच्छे दिनच्या नावावर मोदींनी फसवले. त्यांच्या फसवेगिरीमुळे जनतेच्या बॅँक खात्यात नव्हे, तर डोक्यावर १५ लाखांचे कर्ज होईल. देशासमोर असंख्य प्रश्न असताना हे सरकार धार्मिक मुद्दे चर्चेला ठेवत आहे. मोदी-फडणवीसांनी तरुणांची, शेतकºयांची, व्यापाºयांची फसवणूक केली आहे. हे सर्व घटक मोदींना संपवणार आहेत. देशाच्या राजकारणात भाजप दिसणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करूया.
आ. जयंत पाटील म्हणाले, उंदरात पण पैसे खाता येतात, हे दाखविणारे भाजप सरकार मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावरही पांघरूण घालत आहे. आमच्या आघाडी सरकारवर भ्रष्टाचारी म्हणून भुई थोपटली. अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर अनेक आरोप केले; मात्र गेल्या चार वर्षांत त्यांना एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही. जनतेची फसवणूक करणाºया केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा जनाधार कमी झाला आहे. त्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीला जनता, इतर राजकीय पक्ष आणि न्यायाधीशही कंटाळले आहेत. इंदिरा गांधी, वाजपेयी यांचे सरकार जनतेने उलथवले, तेथे मोदी-फडणवीसांची काय गोष्ट आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अण्णासाहेब डांगे, दिलीपराव पाटील, खंडेराव जाधव यांच्यासह इतर अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आ. सुमनताई पाटील, प्रा. शामराव पाटील, पी. आर. पाटील, विनायकराव पाटील, संग्राम कोते-पाटील, सुरेखा ठाकरे, माजी आमदार जयदेव गायकवाड, अॅड. धैर्यशील पाटील, शहाजी पाटील, अॅड. चिमण डांगे, सुरेंद्र पाटील, प्रतीक पाटील, संग्रामसिंह पाटील, चिपळूणच्या सभापती पूजा निकम उपस्थित होत्या. विजय पाटील यांनी स्वागत केले. संजय पाटील यांनी आभार मानले.
भाजपचे नाकाम सरकार बदला : पवार
माजी उपमुख्यमंत्री, आमदार अजित पवार म्हणाले, केंद्र व राज्यातील भाजपचे नाकाम सरकार बदलण्याची वेळ आली आहे. भाजप-सेना एकाच माळेचे मणी आहेत. त्यांना ग्रामीण भागाचे प्रश्नच माहीत नाहीत आणि छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करतात. छत्रपतींच्या बदनामीचा निषेध करणाºयांवर गुन्हे दाखल होत आहेत. यावरून त्यांचा बेगडीपणा स्पष्ट होतो. चंद्रकांतदादा कर्नाटकावर प्रेम करतात, तर सुभाष देशमुख सरळ सरळ खोटे बोलतात. त्यावरून हे दरिद्री सरकार बेजबाबदारपणे काम करीत असल्याचे स्पष्ट होते. या सरकारला सत्तेवरून बाजूला करण्यासाठी जनतेने राष्टÑवादी कॉँग्रेसला साथ द्यावी.