सांगली महापालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:01 PM2018-05-30T23:01:30+5:302018-05-30T23:01:30+5:30
महापालिका निवडणुकीत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्र बसविण्याची मागणी बुधवारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली.
सांगली : महापालिका निवडणुकीत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्र बसविण्याची मागणी बुधवारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली. पण आयोगाने व्हीव्हीपॅट यंत्रे बसविण्यास असमर्थता दर्शविली आहे. आयोगाकडून दहा दिवसांत लेखी उत्तर आल्यानंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, जिल्हा संघटक बजरंग पाटील, स्वाभिमानी आघाडीचे सहसचिव सतीश साखळकर, रवी खराडे यांनी आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांची भेट घेऊन निवेदन दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे व जिल्हा सुधार समितीनेही व्हीव्हीपॅटसंदर्भात आयोगाला पत्र दिले आहे.
मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्र बसविण्याचा ठराव करण्यात आला होता. हा ठराव बुधवारी शहर जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयोगाकडे दिला.
निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्र बसविण्याचा आग्रहही आयोगाकडे करण्यात आला. पण सचिवांनी त्याबाबत असमर्थता दर्शविली. शिष्टमंडळाने नांदेड महापालिका निवडणुकीचा संदर्भही दिला. आयोगाकडून नांदेडमध्ये केवळ दहा प्रभागांत व्हीव्हीपॅट बसविण्यात आले होते, मतमोजणीवेळी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतात कोणताही फरक आढळला नसल्याचा खुलासा करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये व्हीव्हीपॅट यंत्र बसविण्याबाबत आदेशित केल्याची आठवणही शिष्टमंडळाने करून दिली. पण हा आदेश लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी असून २०१९ पर्यंत ही कार्यवाही पूर्ण केली जाणार असल्याचे आयोगाने सांगितले.
हा आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बंधनकारक नाही. मतदान यंत्र हॅक करण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर आवाहन केले होते. पण कोणीच ते स्वीकारलेले नसल्याचे स्पष्टीकरण आयोगाकडून देण्यात आल्याचे पाटील म्हणाले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्र बसविण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.
गुजरातमधून एव्हीएम नाही
महापालिका निवडणुकीसाठी गुजरातमधून ईव्हीएम यंत्रे आणण्यात आल्याची चर्चा होती. पण आयोगाच्या सचिवांनी ती फेटाळली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेली ईव्हीएम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरली जात नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात. त्यासाठी स्वतंत्र ईव्हीएम यंत्रे असतात. शिवाय दुसऱ्या राज्यातील ईव्हीएम इतर राज्यात वापरले जात नसल्याचा खुलासाही करण्यात आला.
मतदाराने आपले मत कोणाला दिले, हे त्याला समजले पाहिजे. त्यासाठी मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅटचा वापर होऊन निवडणुकीबद्दलचा विश्वास अधिक दृढ व्हावा. नांदेड महापालिकेत काँग्रेसच्या मागणीवरून व्हीव्हीपॅट यंत्रे वापरली होती. त्याच धर्तीवर सांगली महापालिका निवडणुकीतही व्हीव्हीपॅटचा वापर व्हावा. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने दहा दिवसात भूमिका स्पष्ट करावी.
- पृथ्वीराज पाटील,
शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
सांगलीत बुधवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात यावा, यासाठी आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी रवी खराडे, संजय विभुते, सतीश साखळकर, बजरंग पाटील उपस्थित होते.