NCP: राष्ट्रवादीमध्ये वाद हवेत, मग संवाद कार्यक्रम कशासाठी?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 06:27 PM2022-04-25T18:27:04+5:302022-04-25T18:37:52+5:30
सांगली : राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत परिवार संवाद कार्यक्रमातून पक्षवाढीचा मंत्र देण्यात आला; मात्र सांगलीत पक्षाचे नेते तथा जलसंपदामंत्री जयंत ...
सांगली : राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत परिवार संवाद कार्यक्रमातून पक्षवाढीचा मंत्र देण्यात आला; मात्र सांगलीत पक्षाचे नेते तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी वाद हवे असल्याचे सांगितले. वाद असायला हवेत, तर संवाद यात्रा कशासाठी असा प्रश्न आता सामान्य कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. गटबाजीमुळे होणारी कुचंबणा यापुढेही कायम राहण्याचे संकेत असल्याने पक्षांतर्गत नाराजीचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची चिन्हे आहेत.
सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघ तसेच महापालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांत विभागली गेली आहे. एका गटाच्या कार्यकर्त्याला दुसऱ्या गटाकडून झिडकारले जाते. पदांच्या वाटपातही हे राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. शहर जिल्हाध्यक्ष व विधानसभा क्षेत्राध्यक्षांमधील वादाची परंपराही खूप जुनी आहे. सांगली विधानसभा क्षेत्राचे माजी अध्यक्ष दिवंगत कमलाकर पाटील यांनी या गटबाजीवर अनेकदा बंड पुकारले होते. आता उघडपणे या गोष्टी समोर येत नसल्या तरी गटबाजी कायम आहे.
सांगलीत परिवार संवाद कार्यक्रमात जयंत पाटील यांनी स्वत: भाषणात अशी तक्रार आपल्याकडे आल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या वादावर त्यांनी शिक्कामोर्तब केले; मात्र दुसरीकडे हे वाद हवेत, असे मतही मांडले. पक्षात सर्व सुरळीत असेल तर दृष्ट लागते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या याच भूमिकेने सध्या पक्षांतर्गत संभ्रम वाढला आहे.
(सांगलीत राष्ट्रवादीची संवाद नव्हे, विसंवाद यात्रा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले..)
सांगली, मिरजेत गेल्या तीन वर्षांत अन्य पक्षातून अनेक दिग्गज पदाधिकारी, नेते राष्ट्रवादीत आले आहेत. त्यांनाही या गटबाजीचा त्रास होत आहे. पक्षातील ही गर्दी वाढत असताना वादाची तीव्रताही वाढत आहे. पक्षात मुक्तपणा नसल्याची भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे या सर्व बाबींकडे जयंत पाटील दुर्लक्ष करणार का, असा सवालही उपस्थित होतो. अन्य पक्षातून राष्ट्रवादीमध्ये येऊ पाहणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतील या गटबाजीमुळे सावधगिरीची भूमिका घेतल्याचे समजते.
आंदोलनाबाबत कोंडी
कोणत्याही प्रश्नावर एखाद्या पदाधिकायाला आंदोलन करायचे असेल किंवा पत्रकबाजी करायची असेल तर त्याची कल्पनाही ठराविक नेत्यांना द्यावी लागते, अशी खंत काहींनी व्यक्त केली. या समस्या नंतर पक्षासाठी अडचणीच्या ठरू शकतात.