आष्टा शहरातील घरकुल विक्रीची चौकशी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:29 AM2021-03-23T04:29:00+5:302021-03-23T04:29:00+5:30
आष्टा : आष्टा शहरातील गोरगरीब नागरिकांसाठी माजी आमदार स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हाऊसिंग सोसायट्या स्थापन करून गोरगरिबांना घरकुले ...
आष्टा : आष्टा शहरातील गोरगरीब नागरिकांसाठी माजी आमदार स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हाऊसिंग सोसायट्या स्थापन करून गोरगरिबांना घरकुले देण्यात आली आहेत. मात्र, या घरकुलांमधील काही लाभार्थ्यांनी घरकुलांची परस्पर विक्री केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. सुमारे २५ घरकुलांची यादी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना संस्थेने सादर केली आहे.
आष्टा शहर हे घरकुलांचे शहर म्हणून ओळखले जाते. विविध प्रवर्गातील गोरगरिबांना स्वतःचे हक्काचे घरकुल मिळावे, या भावनेने माजी आमदार विलासराव शिंदे यांनी प्रयत्न केले. घरकुल लाभार्थ्याला स्वतःची पंधरा टक्के रक्कम भरून उर्वरित रक्कम केंद्र शासन व राज्य शासन यांनी दिली. हजारो गोरगरिबांना घरकुले मिळाली आहेत. मात्र, यातील काही लाभार्थ्यांनी घरकुलाची परस्पर विक्री केली आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकारी यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मार्च महिन्यामुळे या प्रकरणाची चौकशी एप्रिलपर्यंत पुढे गेली आहे.
मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्थेचे संग्राम शिंदे, शहाजान जमादार, अशोक मदने, सुभाष तगारे, साजन अवघडे व सहकारी यांनी संबंधित घरकुलांची चौकशी करुन ही घरकुले बेघर गोरगरिबांना देण्यात यावीत, अशी मागणी केली आहे.