मिरजेत हवालदार लाच घेताना जाळ्यात
By admin | Published: May 9, 2017 12:01 AM2017-05-09T00:01:24+5:302017-05-09T00:01:24+5:30
मिरजेत हवालदार लाच घेताना जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अपघातातील वाहन सोडविण्यासाठी मदत करतो, असे सांगून चार हजारांची लाच घेणाऱ्या हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. श्रीरंग विठोबा कोळेकर (वय ५३, रा.पोलीस वसाहत विश्रामबाग सांगली) असे त्याचे नाव आहे. सोमवारी रात्री नऊ वाजता ही कारवाई करण्यात आली.
श्रीरंग कोळेकर हा मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. महिन्यापूर्वी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अपघात झाला होता. या अपघातातील वाहन जप्त करण्यात आले होते. याचा तपास कोळेकरकडे होता. वाहन मालकाने वाहन सोडवून घेण्यासाठी कोळेकर याची भेट घेतली. कोळेकर याने न्यायालयाच्या आदेशाने वाहन द्यावे लागते. यासाठी त्याने चार हजारांची लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम दिली तरच मदत केली जाईल, असे त्याने सांगितले. त्यामुळे वाहन मालकाने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. या विभागाने तक्रारी चौकशी केली. यामध्ये कोळेकरने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. कोळेकरने वाहनमालकास लाचेची रक्कम सोमवारी रात्री सांगली-मिरज रस्त्यावरील शेख आर्थोपेडिक हॉस्पिटलवजळ घेऊन बोलाविले होते. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा लावला होता. कोळेकरने लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यास पकडले. त्याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याला मंगळवारी दुपारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. (प्रतिनिधी)