अटलबिहारी की सिंधुताई? नगरसेवकांची हातघाई, सांगली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रणकंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 12:28 PM2023-02-18T12:28:44+5:302023-02-18T12:30:12+5:30
सांगली : नेमीनाथगरमधील बालोद्यानाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव द्यायचे की सिंधुताई सपकाळ यांचे, या विषयावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रणकंदन ...
सांगली : नेमीनाथगरमधील बालोद्यानाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव द्यायचे की सिंधुताई सपकाळ यांचे, या विषयावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रणकंदन झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप नगरसेवक आमनेसामने आले. अखेर कोणताही निर्णय न होता विषय गुंडाळला गेला. सभेत दिवसभर श्रेयवादाचेच राजकारण सुरू होते.
महापालिकेने नेमीनाथनगरमध्ये बालोद्यान (चिल्ड्रन पार्क) उभारले आहे. त्याला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची ठराव नगरसेविका गीतांजली ढोपे-पाटील यांनी तीन-चार महिन्यांपूर्वी मांडला होता. त्याला मंजुरीही मिळाली होती, पण महापालिका अंमलबजावणी करत नसल्याने त्यांनी रुद्रावतार धारण केला. त्यावर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी उत्तर देण्यापूर्वीच विष्णू माने बोलायला उभारले. बालोद्यानाला सिंधुताई सपकाळ यांचे नाव देण्याची मागणी केली.
त्यामुळे भाजप नगरसेवकांच्या संतापाचा उद्रेक झाला. सर्वपक्षीय नगरसेवक आमनेसामने आले. घोषणाबाजी सुरू झाली. भाजपाचा धिक्कार असो, महापौरांचा विजय असो अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. सुमारे अर्धा तास गदारोळ सुरू होता. अखेर विषय तसाच गुंडाळला गेला.
कोण काय म्हणाले?
- कुपवाड अजूनही अंधारात, विद्युत विभागातील ५० टक्के कर्मचाऱ्यांना महापालिका पोसतेय. त्यांना काढून टाका. - विजय घाडगे
- विद्युत विभागातील अतिरिक्त कर्मचारी पाणीपट्टी वसुलीला पाठवा. - जगन्नाथ ठोकळे
- टक्के सगळ्याच नगरसेवकांना इंग्रजी येत नाही, मोठ्या कामाचे प्रस्ताव मराठीत करा. - संजय मेंढे
- समुद्रा कंपनीसोबत एलईडी करारावर अधिकाऱ्यांनी डोळे झाकून सह्या केल्या. - विष्णू माने
- शहरातील अनेक दिवे बसवल्यापासून बंदच. शिक्षण मंडळ नियुक्त करा, लोकसहभागातून शाळा सक्षम करा - संतोष पाटील
- कुपवाडमध्ये मंडई, बालोद्यान करा - शेडजी मोहिते
अनिता वनखंडे सभागृहाबाहेर
समाजकल्याण सभापती अनिता वनखंडे यांना रुग्णालयाच्या दुरवस्थेविषयी बोलायचे होते, पण महापौरांनी बोलण्याची संधी दिली नाही. त्यामुळे त्या रागाने निघून गेल्या. सभागृह नेत्या भारती दिगडे यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दिगडे कडाडल्या, ५० नगरसेवक निवडून आणू
भारती दिगडे म्हणाल्या, बालोद्यानाला वाजपेयींचे नाव देण्यास होणारा विरोध निषेधार्ह आहे. पण महापालिकेत आम्ही ५० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू, तेव्हा सांगलीत सर्वत्र आम्हीच नावे देऊन दाखवू.