शिरसीतील खुनाचा अद्याप शोध नाहीच-श्वानपथक तीस मीटरपर्यंतच घुटमळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 09:22 PM2017-11-20T21:22:59+5:302017-11-20T21:42:38+5:30
शिराळा : शिरसी (ता. शिराळा) येथील चक्र भैरवनाथ मंदिराच्या गाभाºयात शनिवार, दि. १८ रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. अद्याप या मृताची ओळख पटलेली नाही.
शिराळा : शिरसी (ता. शिराळा) येथील चक्र भैरवनाथ मंदिराच्या गाभाºयात शनिवार, दि. १८ रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. अद्याप या मृताची ओळख पटलेली नाही. यातील संशयित खुन्यांच्या शोधासाठी पोलिस तपासाची चक्रे वेगात फिरत असून, सोमवारी श्वानपथक आणण्यात आले होते. मात्र श्वानाने मंदिराच्या मागे तीस मीटरपर्यंत माग काढला व ते तेथेच घुटमळले.
रविवारी दि. २० रोजी कोल्हापूर परिक्षेत्र अधिकारी विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या होत्या. त्यादृष्टीने सोमवारी श्वानपथक आणण्यात आले होते. या श्वानाने संशयित गुन्हेगाराचा मंदिराच्या मागे तीस मीटरपर्यंत व डोंगरावर जिथंपर्यंत गाडी जाऊ शकते, त्या पायवाटेपर्यंत माग काढला व तेथेच श्वान घुटमळले. त्यामुळे पोलिसांना शोध घेण्यासाठीचा हा मार्ग थांबला आहे.
तेथील परिस्थिती पाहता, हा नरबळी असावा, अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे. शिराळा पोलिसात अज्ञात व्यक्तीकडून अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिरसीजवळील चक्रोबा डोंगरावर हे मंदिर आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम २०१३ पासून चालू असून, शनिवारी सकाळी कामगार या मंदिरात आले असताना, त्यांना हा मृतदेह दिसला होता. या मंदिराच्या गाभाºयात मूर्तीजवळ लिंबूला टाचण्या खोवल्या होत्या. तसेच गुलाल, हळद, कुंकू होते. मृतदेहाजवळ एका प्लॅस्टिक पिशवीतही याच वस्तू होत्या. मृतदेहावरील कपड्यांच्या खिशात पोलिसांना पाचवा मैल ते अंकलखोप या प्रवासाचे एसटी बसचे तिकीट सापडले आहे. मृत व्यक्तीच्या अंगावर नवीन कपडे होते. तसेच डोक्याच्या मागील बाजूस दगड, विटेने मारले असावे.
कारण या विटेवर व दगडावर रक्त लागले होते.
नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख बोराटे, उपविभागीय पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, प्रवीण जाधव यांनी पाहणी केली. यावेळी मंदिराचे विश्वस्त दत्तात्रय महिंद, निवृत्त पोलिस अधिकारी बापूराव जाधव, सरपंच रुपाली भोसले, शेखर भोसले, मंदिराचे काम करणारे गवंडी आदींकडे चौकशी करून त्यांनी माहिती घेतली. याचबरोबर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करणाºया कामगारांची चौकशी करण्याची सूचना केली.
एसटी बस तिकीट या पुराव्यावरून तीन ते चार ठिकाणी पोलिस पथके पाठवण्यात आली आहेत. आता कोणत्या पोलिस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची नोंद होते, याकडेही पोलिस लक्ष ठेवून आहेत. या मृत व्यक्तीची ओळख पटली, तर आरोपीला पकडणे सोपे होणार आहे.
प्रवास तिकिटावरुनच शोध सुरू
कोणत्या पोलिस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीबद्दल वर्दी नोंद होते, याची माहिती घेण्याचे पोलिस यंत्रणेचे काम चालू आहे. मृत व्यक्तीच्या खिशात सापडलेल्या पाचवा मैल ते अंकलखोप या एसटी प्रवास तिकिटावरून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून चालू आहे.