कोविशिल्डचे तब्बल ५८ हजार डोस आले, लसटोचक मात्र नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:43+5:302021-07-03T04:17:43+5:30
सांगली : जिल्ह्यासाठी गुरुवारी रात्र तब्बल ५८ हजार कोरोना लसींचा पुरवठा झाला. सर्वत्र पूर्ण क्षमतेने लसीकरण सुरू झाले. पण, ...
सांगली : जिल्ह्यासाठी गुरुवारी रात्र तब्बल ५८ हजार कोरोना लसींचा पुरवठा झाला. सर्वत्र पूर्ण क्षमतेने लसीकरण सुरू झाले. पण, लस टोचण्यासाठी आरोग्य केंद्रांकडे लसटोचक मात्र नसल्याची गंभीर स्थिती होती.
कर्मचाऱ्यांअभावी जिल्हाभरात गोंधळ सुरू होता. सकाळपासूनच जिल्हा परिषदेकडे तक्रारींचा ओघ सुरू झाला होता. जिल्ह्यात जानेवारीमध्ये लसीकरण सुरू झाल्यापासून यापूर्वी दोन वेळाच इतका मोठा पुरवठा झाला होता. गुरुवारी रात्री कोविशिल्डचे ५८ हजार डोस मिळताच सकाळपासून सर्व केंद्रांवर तातडीने वितरण करण्यात आले. महापालिकेला आठ हजार डोस मिळाले. जिल्हाभरात २२५ हून अधिक केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. ग्रामीण भागात उपकेंद्रांतही लसीकरण सुरू करण्यात आले. महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांतही लसीकरण सुरू झाले.
सध्या १८ ते ३०, ३० ते ४५ आणि ४५ वर्षांवरील वयोगटाला लस देण्यात येत आहे. ४५ वर्षांवरील वयोगटात ८४ दिवस पूर्ण झाल्यावर दुसऱ्या डोसला प्राधान्य आहे. त्यामुळे सर्व केंद्रांवर लसीसाठी तोबा गर्दी आहे. लसटोचक नसल्याने सावळागोंधळ सुरू होता. लसटोचकांना कार्यमुक्त केल्याने तेथे अन्य कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेतले जात आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी गुरुवारी रात्रीपासूनच लसटोचकांच्या पुनर्नियुक्तीसाठी पाठपुरावा सुरू केला. कार्यमुक्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांकडून आल्याची माहिती मिळाली. लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या काळात लसटोचकांना कार्यमुक्त केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांना पुन्हा नियुक्त करण्याची मागणी कोरे यांनी केली आहे.
चौकट
१४८ जणांना कार्यमुक्ती
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १४८ लसटोचकांना ३० जून रोजी कार्यमुक्त करण्यात आले. त्यांना लस येईल, त्यादिवशी प्रतिदिन ५०० रुपये मानधन दिले जात होते, त्यामुळे त्यांचा विशेष आर्थिक भार शासनावर नव्हता. त्यांची सेवा संपवल्याने लसीकरणाच्या मोहिमेत मात्र अडथळे निर्माण होणार आहेत.