तासगाव बाजार समितीची निवडणूक: आमदार गटाची कसरत; खासदार गटाचे बेरजेचे राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 05:11 PM2023-04-21T17:11:14+5:302023-04-21T17:12:22+5:30
तिसऱ्या आघाडीच्या निर्णयाने कलाटणी
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव बाजार समितीसाठी दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. मात्र उमेदवारी निश्चित करताना आमदार गटाची कसरत झाल्याचे दिसून आले, तर खासदार गटाने मात्र बेरजेचे राजकारण करतानाच, तिसऱ्या आघाडीला सामावून घेतले. तिसऱ्या आघाडीच्या निर्णयाने कलाटणी मिळाल्याचे चित्र आहे.
येथे राष्ट्रवादी, जयंत पाटील गट, भाजप आणि आमदार, खासदार गटाव्यतिरिक्त एकत्रित झालेली सर्वपक्षीय तिसरी आघाडी, असे वेगवेगळे अर्ज स्वतंत्रपणे दाखल झाले होते. ‘सेटलमेंट’पासून तिरंगी लढतीपर्यंत चर्चा होत होत्या, मात्र नेमके चित्र स्पष्ट होत नव्हते. गुरुवारी अर्ज माघारीनंतर दुरंगी लढतीचे नेमके चित्र स्पष्ट झाले; मात्र ही दुरंगी लढत होत असताना राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित करताना आमदार गटाची तारेवरची कसरत झाली.
दुसरीकडे अनपेक्षितपणे खासदार संजय पाटील यांनी तिसऱ्या आघाडीशी हातमिळवणी करण्यासाठी पुढाकार घेतला. तिसऱ्या आघाडीतील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील, भाजपचे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा अध्यक्ष स्वप्नील पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रताप पाटील, वंजारवाडीचे सरपंच अरुण खरमाटे यांनी भाजपसोबत युती केली.
तिरंगी लढत झाल्यास, तिसऱ्या आघाडीच्या मत विभाजनामुळे भाजपला फटका बसेल आणि राष्ट्रवादीच्या विजयाचा मार्ग सुकर होईल, असे चित्र होते. तिसऱ्या आघाडीने भाजपशी हातमिळवणी केल्यामुळे दुरंगी चुरशीचा सामना होणार असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी
राष्ट्रवादीच्या उमेदवार यादीवर जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांचा पगडा असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या समर्थकांची संख्या जास्त आहे, तर जयंत पाटील गटाला अपेक्षित जागा न मिळाल्याने अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदी दिसून आली. राष्ट्रवादीकडून मणेराजुरीमध्ये एकाच गावातील दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.